12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट:आता विशेष भरारी पथक स्थापन; गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई- विभागीय आयुक्त




फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासोबतच विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही विभागीय आयुक्तांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षा दि. 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचे विभागीय आयुक्त पापळकर यांनी सांगितले. परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देण्यासाठी विभागीय स्तरावर विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान, दि. 10 फेब्रुवारी रोजी जैतापूर (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील परीक्षा केंद्रावर शिक्षक व पर्यवेक्षकांकडून कॉपी पुरविल्याचा प्रकार तसेच बीड तालुक्यातील चौसाळा येथे ड्रोनद्वारे कॉपी पुरविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणांमुळे परीक्षेतील गैरप्रकार निदर्शनास आले आहेत. या प्रकरणांस जबाबदार असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ निलंबन व आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करून अनुपालन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील कालावधीत कुठेही गैरप्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिला. परीक्षेत गैरप्रकार करताना आढळलेल्या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेस अपात्र ठरविणे, गुन्हे दाखल करणे, निलंबन व चौकशी यांसारख्या कारवाया होऊ शकतात. त्यामुळे परीक्षेशी संबंधित सर्व घटकांनी कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबू नये, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाला सर्वोच्च सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे व आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *