अजित पवार अपघातावरून संभ्रम नको; सखोल चौकशी व्हावी:रोहित पवारांच्या मागणीला अनिल पाटलांचा पाठिंबा, मात्र राजकारण टाळण्याचे आवाहन




राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशीची मागणी करताना रोहित पवार यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही पक्ष असो, सर्वांचीच इच्छा आहे की या अपघाताची योग्य आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांबाबत आम्हाला तपशीलवार माहिती नसली तरी, नेत्याच्या निधनाचे दु:ख सर्वांनाच आहे आणि चौकशी योग्य पद्धतीने व्हावी, याला प्रत्येकजण पाठिंबा देईल, असे ते म्हणाले. अनिल पाटील पुढे म्हणाले की, रोहित पवार यांनी चौकशीची मागणी केली आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. त्यांनी अभ्यास करून भूमिका मांडली असेल, त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे, कारण ते अभ्यासू नेते आहेत. मात्र, या प्रकरणाचे राजकारण करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले. संभ्रम निर्माण करू नये अनिल पाटील म्हणाले की, अजित पवार कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, याचा निर्णय ते स्वतः घेत असत. प्रवासाचा निर्णयही त्यांनी स्वतःच घेतला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य टाळले पाहिजे, अन्यथा प्रकरणाची दिशा बदलू शकते, असे पाटील यांनी सांगितले. तसेच, अजित पवार कोणाला भेटणार होते याची माहिती रोहित पवार यांना होती की नाही, हे माहीत नाही. त्यामुळे विनाकारण आरोप करू नयेत. चौकशीची दिशा बदलण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार आमच्या पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत असतील, तर त्याबाबत आम्हाला काही देणंघेणं नाही, असेही अनिल पाटील यांनी सांगितले. रोहित पवार काय म्हणाले? रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले की, 28 जानेवारीला अजित पवारांचा विमान कोसळून मृत्यू झाला. त्या दिवशी शरद पवारांनी हा अपघातच आहे, यात राजकारण करू नका, असे आवाहन केले होते. मात्र, अजित पवारांच्या तेराव्यानंतर शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपातच आहे. याची सखोल चौकशी भारतीय यंत्रणांसह फ्रान्समधील बीईए आणि अमेरिकेतील एएआयबी या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशी करा, अशी मागणी केली. इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या कार्यपद्धतीचा संदर्भ देत विमान कंपनीचा मालकी हक्क आणि सुरत कनेक्शनवर त्यांनी संशय व्यक्त केला. अपघाताच्या चौकशीची मागणी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी का केली नाही, 2 दिवस आधी विमान सुरतला का गेले, असा सवाल करत सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असा दावाही रोहित यांनी केला. मंगळवारी मुंबई येथील पत्रकार परिषदेत रोहित यांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब, आणि विमानाची तांत्रिक स्थिती याविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले. कागदावर कंपनीचे 3 शेअर होल्डर असले तरी प्रत्यक्षात 27 लोक मागे असून वेळ पडल्यास त्यांची नावे उघड करणार आहे. रोहित पवारांचे प्रश्न, मुद्दे
1 अजित पवारांचा दौरा, विमानाची वेळ, पायलट का बदलला?
2. केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल व एटीसी ट्रान्सस्क्रिप्टमधील वेळांत विसंगती का?
3. दृश्यमानता कमी असताना लँडिंग का?
4. विमानाचा आवाज वेगळा का येत होता? ट्रान्सपाँडर बंद होता की बंद केला?
5. वैमानिक सुमीत कपूरला दारू प्यायल्याबद्दल तीन वर्षे निलंबित केले होते.
6. कपूरने अवघड रनवेची निवड का केली?
7. मृत्यू समोर असतानाही कपूर गप्प का होता?
8. फॉरेन्सिकची टीम उशिरा का आली ? ही घटना केवळ अपघात – शरद पवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घातपाताचा संशय व्यक्त करत सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवार म्हणाले होते की, ही घटना दुर्दैवी असून याकडे केवळ अपघात म्हणून पाहायला हवे. या प्रसंगाला राजकीय रंग देण्याचे प्रयत्न होऊ नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks