![]()
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने दैदीप्यमान विजय मिळवला असला तरी, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना साताऱ्यात आपल्या घरातील सदस्यांच्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर बोलताना गोरे यांनी सोलापूरमधील माळशिरसच्या राजकारणावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची खळबळजनक माहिती देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. तसेच, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गोरे यांचा उल्लेख ‘गुंड’ असा करून केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. जयकुमार गोरे म्हणाले, जे मला गुंड म्हणत आहेत, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली, ज्या पद्धतीची भाजपला मत मिळाली आहे, ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता अशी माहिती समोर येत आहे. पोलिस याचा तपास करत आहे. तसेच हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तापासात समोर येईल. याबाबत कोण गुंडा आहे? हे समोर येईलच, त्यानंतर आपण चर्चा करू असेही गोरेंनी म्हटले. पराभव झाल्यानंतर कारण सांगण्याची मला सवय नाही, पराभव का झाला याचं विश्लेषण मी करणार नाही. मात्र, झालेला पराभव स्वीकारतो. सोलापूरकडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. पण, केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही, असे म्हणत साताऱ्यात जिल्हा परिषदेला भाऊ आणि वहिनींच्या झालेल्या पराभवावर जयकुमार गोरे यांनी भाष्य केलं. तसेच, असे अनेक पराभवाचे धक्के स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो. राजकारणात प्रत्येक जण असा पराभव घेऊन जातो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे, पराभव हा अंतिम नसतो आणि विजय अंतिम नसतो. केवळ, आपल्या कामात सातत्य असले पाहिजे, असेही गोरेंनी म्हटले. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केल्यानंतर त्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी चौकशी झालीच पाहिजे असे ठाम मत व्यक्त केले. बारामती विमान अपघाताची चौकशी सध्या सुरू असून विमानाचा ब्लॅक बॉक्स प्राप्त झाल्याने या प्रकरणातील अधिक तपशील समोर येतील, असेही त्यांनी नमूद केले. या तपासासाठी नेमकी कोणती यंत्रणा असावी, याचा निर्णय सुरक्षा एजन्सी तसेच राज्य आणि केंद्र सरकार घेतील, असे सांगत त्यांनी या संवेदनशील विषयावर अधिक भाष्य करणे तूर्तास टाळले आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षातीलच काही लोकांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपची वाढती प्रगती आणि यश काही लोकांना पचत नसून, अशा प्रवृत्ती आजही पक्षात कार्यरत आहेत, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. हा विजय केवळ व्यक्ती म्हणून जयकुमार गोरे किंवा इतर कोणा नेत्याचा नसून, तो भाजपच्या संघटनेचा आणि निष्ठवान केडरचा असल्याचे सांगत त्यांनी विजयाचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या मजबुतीला दिले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनी आणि पक्षांतर्गत काही मंडळींनी आखलेल्या गुप्त रणनीतीचाही पर्दाफाश केला. पालकमंत्री अपयशी ठरल्यास काय करायचे आणि बहुमत न मिळाल्यास कोणाशी हातमिळवणी करायची, याचा पद्धतशीर प्लॅन तयार करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. पक्षापेक्षा स्वतःला मोठे सिद्ध करण्याचा आणि पक्षनेतृत्वाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न कार्यकर्त्यांनी उधळून लावला. कोणत्याही आमिषाला बळी न पडता खंबीरपणे पक्षाच्या मागे उभे राहिल्याबद्दल त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेचे विशेष आभार मानले.
राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता:मंत्री जयकुमार गोरेंचा दावा, कोणी कट रचला हे समोर येईलच- मंत्री जयकुमार गोरे
