काल रात्री मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलने इराणमधील एका शैक्षणिक संस्थेवर हल्ला केल्यानंतर इराणने त्याला तशाच प्रकारे प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. या परस्पर हल्ल्यांमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून दोन्ही देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींमध्ये काही अमेरिकन सैनिकांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. लेबनॉनमधून अनेक सैनिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून काही संघटना इराणला मदत करत इस्रायलवर रॉकेट हल्ले करत असल्याचेही समोर आले आहे.
इस्रायली संरक्षण दलाच्या प्रमुखांनी (IDF Chief) सांगितले की सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे सैनिक नाहीत आणि अतिरिक्त 15,000 सैनिकांची गरज भासत आहे. सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अनेक ठिकाणी लोक भीतीने ओरडत असल्याचे दृश्य दिसत आहे. इस्रायलमधील हल्ल्यांमध्ये सुमारे 135 जणांचा मृत्यू झाल्याची आणि 2000 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 
दरम्यान, अमेरिकेची KC-135 हवाई इंधन भरणारी तीन विमाने नष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सौदी अरेबियातील सुलतान एअर बेसवर अमेरिकन सैनिकांवर हल्ला झाल्याचे वृत्त असून मागील चार आठवड्यांत 30 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेत. इराणमध्येही मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून हजारो लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. यात वरिष्ठ सैनिकी आणि अर्धसैनिक अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
लेबनॉनमध्ये इस्रायली सैनिकांवर हल्ले झाल्यानंतर जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरद्वारे परत आणण्यात आले, अशी माहिती इस्रायली माध्यमांनी दिली आहे. काही ठिकाणी विमानांना आग लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणी क्षेपणास्त्रे आकाशात स्पष्टपणे दिसल्याचे सांगितले जात आहे. इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपूर्वी कोणतीही आगाऊ सूचना मिळत नसल्याने संरक्षण यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
इस्रायलने इराणच्या स्टील प्लांट, लॉजिस्टिक नेटवर्क तसेच पाणी प्रकल्पांवरही हल्ले केल्याचे वृत्त आहे. सैन्याला पुरवठा थांबवण्यासाठी हे लक्ष्य करण्यात आल्याचे मानले जात आहे. तसेच एका सॅटेलाइट स्टेशनलाही लक्ष्य करून नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Post Views: 22
