मी स्वतःलाच मत दिलं नव्हतं का? जळगावात महिला उमेदवाराचा सवाल:शून्य मतांचा धक्का; EVM वर पुन्हा संशयाची छाया, निकालाने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह




निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स संदर्भात आरोप-प्रत्यारोप आणि शंका नव्या नाहीत. विरोधकांकडून सातत्याने संशय व्यक्त केला जातो, तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी EVM पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण दिले जाते. मात्र, जळगाव महानगरपालिका निवडणुकीत घडलेल्या एका घटनेमुळे हा वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. प्रभाग क्रमांक 1-अ मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या सुनंदा भागवत फेगडे या महिला उमेदवाराला थेट 0 म्हणजेच शून्य मते मिळाल्याचे निकालात समोर आले. या निकालाने केवळ जळगावच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडाला आहे. सुनंदा फेगडे यांचा साधा, पण थेट प्रश्न आहे मी स्वतःला तरी मतदान केलं नव्हतं का? घरातील लोकांनी मतदान केलं की नाही, हा वेगळा मुद्दा असू शकतो; मात्र स्वतः उमेदवाराने स्वतःला दिलेलं मतही निकालात शून्य कसं दिसू शकतं, याचं उत्तर कोण देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी EVM प्रणालीवर संशय व्यक्त केला असून, ही घटना म्हणजे EVM मधील संभाव्य गडबडीचा पुरावा असल्याचा दावा केला आहे. बामसेफ, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी देशभरात वारंवार EVM बाबत शंका व्यक्त केल्या आहेत; जळगावातील हा निकाल त्याच आरोपांना बळ देणारा असल्याचे फेगडे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनंदा फेगडे यांनी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. माझ्या घरातल्या लोकांची मतं जाऊ द्या; पण माझं स्वतःचं मत मी मला दिलं होतं. मग ते मत कुठे गेलं? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. मत EVM मध्ये जातं की निकाल थेट भाजपकडे जातो, असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आयोग शांत राहतो आणि स्पष्टीकरण मात्र सत्ताधारी पक्षाकडून येतं, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक असल्याचे त्या म्हणाल्या. EVM सरकारी आहे, निवडणूक आयोग घटनात्मक आहे; पण खुलासा पक्षीय पातळीवरून दिला जातो—ही आजच्या लोकशाहीची शोकांतिका आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. फेगडे यांच्या मते, आजची लोकशाही अशी झाली आहे की बटन मतदार दाबतो, निकाल मशीन ठरवतं आणि त्यावरचं स्पष्टीकरण एखादा पक्ष देतो. या प्रक्रियेत सामान्य मतदाराचा आवाज हरवतो, असा त्यांचा आरोप आहे. मी मला मत दिलं होतं, ते मत दिसत नाही; आयोग म्हणतो EVM सुरक्षित आहे आणि भाजप म्हणतो जनतेचा कौल आहे. मग प्रश्न असा पडतो की माझं मत अवैध ठरलं का? की आता मतदाराचाच कौल अनावश्यक झाला आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नांना थेट उत्तर देण्याऐवजी विरोधकांकडून EVM वर प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीवर संशय घेणं, अशी टीका केली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर हा मुद्दा केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित राहिलेला नाही. EVM बाबत आधीपासून असलेली अविश्वासाची भावना या घटनेमुळे अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून EVM मध्ये कोणतीही छेडछाड शक्य नसल्याचा दावा केला जातो; मात्र प्रत्यक्ष निकालात उमेदवाराला शून्य मते दिसल्यावर सामान्य मतदारांच्या मनात प्रश्न उभे राहतात. जर उमेदवाराचंच मत मोजलं जात नसेल, तर मतदाराने दिलेल्या मतांची खात्री कशी द्यायची? असा प्रश्न आता जाहीरपणे विचारला जात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे अधिक पारदर्शकतेची मागणी केली आहे. काहींनी व्हीव्हीपॅट स्लिप्सची 100 टक्के पडताळणी करण्याची गरज व्यक्त केली आहे, तर काहींनी संपूर्ण मतदान प्रक्रियेवर स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मात्र, आयोगाकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाकडून हा जनतेचा कौल आहे, असे सांगत प्रकरण लहान करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप फेगडे यांनी केला आहे. या दोन टोकांच्या भूमिकांमुळे EVM वाद अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *