![]()
राज्य शासनातर्फे वर्षभरात साजरी केली जाणारी राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींची जयंती तसेच राष्ट्रीय दिनांच्या अधिकृत यादीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०२५ रोजी, वर्ष २०२६ साठी महापुरुषांच्या जयंती व राष्ट्रीय दिनांचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र, या यादीमध्ये महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जडणघडणीत मोलाचे स्थान असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा उल्लेख राहून गेल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रीय कुणबी महासंघाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी ही तांत्रिक चूक आमदार परिणय फुके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आमदार फुके यांनी पत्राद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून तातडीने सुधारित परिपत्रक काढण्याची विनंती केली आहे. प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी स्पष्ट केले की, संत तुकाराम महाराजांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. शासन स्तरावर त्यांच्या जयंतीचा उल्लेख नसल्याने वारकरी संप्रदाय आणि अनुयायांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. लोकप्रतिनिधींनी या विषयाची तत्परतेने दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शासकीय स्तरावर जयंती साजरी होणे आवश्यक ”संत तुकाराम महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक होते. त्यांच्या अभंगवाणीतून त्यांनी समता, मानवता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. आजच्या पिढीला त्यांचे विचार कळावे यासाठी शासकीय स्तरावर त्यांची जयंती साजरी होणे आणि परिपत्रकात त्याचा सन्मानपूर्वक उल्लेख असणे आवश्यक आहे,” असे आमदार परिणय फुके म्हणाले.
संत तुकाराम महाराज जयंतीचा शासकीय परिपत्रकात समावेश करा:आमदार परिणय फुके यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
