पळवून अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोघांनाअटक;  उस्माननगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 


उस्माननगर (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेला पळवून नेल्याच्या गंभीर प्रकरणाचा उस्माननगर पोलिसांनी यशस्वी तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन जणांनी बालिकेवर शारीरिक अत्याचार केला आहे हे उघड झाल्याने या प्रकरणात पोक्सो कायदा जोडण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

सदर अल्पवयीन बालिका जानेवारी महिन्यात शाळेत गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाली होती. याप्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात दिनांक 14 ऑक्टोबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक मदतीने शोध मोहीम सुरू केली.

तपासादरम्यान संबंधित बालिका गोवा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तात्काळ गोव्याकडे रवाना झाले; मात्र आरोपींनी तेथून ठिकाण बदलले असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात आरोपी मालेगाव एमआयडीसी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
• शिवाजी रामकिशन बीचेवाड (वय २०) रा. ता. लोहा, जि. नांदेड
• आकाश आनंद बीचेवाड (वय 19), रा. वडेपुरी, ता. लोहा, जि. नांदेड

ही कारवाई पोलीस उपाधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, पोलीस अंमलदार वसंत तिडके,साईनाथ मोरे,प्रकाश पेद्देवाड व दीपक ओढणे यांच्या पथकाने पार पाडली. सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक तपास आणि समन्वयाच्या जोरावर उस्माननगर पोलिसांनी मिळवलेले हे यश प्रशंसनीय मानले जात आहे.

Post Views: 467






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *