उद्धव ठाकरेंचा आदेश चंद्रपूरमधील शिवसैनिकांनी धुडकावला:ठाकरे गटाच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर; आता शिस्तभंगाची तयारी




चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या घडामोडींनी मंगळवारी अनपेक्षित वळण घेतले. काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अचानक पूर्णविराम मिळाला आणि भाजपचा महापौर निवडून आला. या विजयामागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा निर्णायक ठरला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकत पालिकेत सत्ता स्थापन केली. या निकालानंतर आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. पक्षनेतृत्वाची भूमिका भाजपसोबत न जाण्याची असताना, चंद्रपूरमधील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेतल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींना याबाबत पूर्वकल्पना न देता भाजपला पाठिंबा देण्यात आल्यामुळे आता जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि सहा नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत खळबळ माजली आहे. महापौर निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने बहुमताचा आकडा 33 वर गेला. एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्याने संपूर्ण समीकरण बदलले. या एका मताच्या फरकाने भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण पसरले. या सगळ्या घडामोडींमध्ये सकाळी संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधी बाकांवर बसावे लागले तरी चालेल, पण भाजपला मदत करायची नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, काही तासांतच चंद्रपूरमध्ये समीकरणे बदलली. महापौरपद देण्यास काँग्रेस तयार नव्हती स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयामागचे कारण संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, शिवसेनेला महापौरपद मिळावे यासाठी काँग्रेसशी चर्चा सुरू होती. त्यांनी सकाळी विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात जाऊन विनंतीही केली. पण पाच वर्षांत कुठेही महापौरपद देण्यास काँग्रेस तयार नव्हती. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर भाजपसोबत चर्चा सुरू झाली. गिऱ्हे यांनी सांगितले की, किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्कातून एक फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यानुसार पहिली सव्वा वर्षे भाजपचा महापौर, त्यानंतर शिवसेनेचा महापौर, उपमहापौर पद पाच वर्षे शिवसेनेकडे, तसेच स्थायी समितीचे पहिले आणि चौथे वर्ष शिवसेनेकडे राहील, असा समझोता करण्यात आला. या करारानुसार पाठिंबा देण्यात आला. भाजपने एका मताच्या जोरावर सत्ता मिळवली एकीकडे पक्षनेतृत्वाची भूमिका आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवरील निर्णय यामुळे चंद्रपूरमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजपने एका मताच्या जोरावर सत्ता मिळवली असली तरी ठाकरे गटासाठी ही परिस्थिती राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीची ठरली आहे. येत्या काळात पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो आणि या प्रकरणाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *