मुदखेडच्या पोलिसाने नांदेड ग्रामीण हद्दीत हजेरी लावलीच कशासाठी? निलंबनाने अनेक प्रश्न उपस्थित; वाळूमाफिया, कथित वसुली आणि पत्रकारितेच्या नावावर सुरू असलेल्या प्रकारांची निष्पक्ष चौकशी होणार का?
नांदेड (खास प्रतिनिधी) – ७ ऑक्टोबर २०२०६ रोजीअसर्जन परिसरात घडलेल्या घटनेचा संदर्भ देत आता नव्याने काही माहिती समोर येत असल्याची चर्चा आहे. संबंधित घटना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात पोलीस अमलदार माधव डफडे यांचे नाव पुढे आले असून, त्यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीमुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव डफडे यांची यापूर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. अगोदर लोहा ठाण्यात नियुक्ती होती. त्यानंतर त्यांची बदली मुदखेड येथे झाली होती. मग मुदखेड येथे नियुक्त असताना ते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमके काय करत होते? हा साधा प्रश्न नसून, संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ते अधिकृत कामासाठी तेथे गेले होते की अन्य कोणत्या कारणासाठी, याचे उत्तर संबंधित चौकशी नंतर स्पष्ट होईल.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही जणांकडून वाळूच्या कथित वसुलीची चर्चा केली जात आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने त्याला सिद्ध तथ्य मानता येणार नाही. सत्य नेमके काय, हे चौकशीतूनच समोर आले पाहिजे. केवळ आरोपांच्या धुरात सत्याचा गळा घोटला जाऊ नये आणि कोणालाही पुराव्याशिवाय दोषी ठरवले जाऊ नये.
माधव डफडे यांनी गैरवर्तन केले की त्यांच्यासोबत गैरवर्तन झाले? वाळूच्या व्यवहाराशी संबंधित व्यक्तींनी त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली की वादाला सुरुवात दुसऱ्याच बाजूने झाली, याचा उलगडा निष्पक्ष चौकशीतून होणे गरजेचे आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब, उपलब्ध सीसीटीव्ही चित्रण, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुरावे तपासले, तर सत्यापर्यंत पोहोचणे अशक्य नाही. घटना अनेकांनी पाहिली असल्यास, संबंधितांची ओळख पटवणे आणि जबाब नोंदवणे ही पोलिसांसाठी फार मोठी कसरत ठरू नये.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत माधव डफडे यांना निलंबित करून पोलीस मुख्यालयात पाठविल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे प्राथमिक चौकशीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी निलंबन म्हणजे अंतिम दोषसिद्धी नव्हे. चौकशीअंती पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, येथे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. पोलीस कर्मचाऱ्याने चूक केली असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे; पण त्याला मारहाण करणाऱ्यांना कायद्याचे अभय का मिळावे? कायदा हा पोलिसांसाठी वेगळा आणि सामान्य नागरिकांसाठी वेगळा नाही. त्याचप्रमाणे पोलिसांवर आरोप झाले म्हणून त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा परवानाही कोणाला मिळत नाही. दोष कोणाचाही असो, कायद्याचा हात दोन्ही बाजूंना पोहोचला पाहिजे.
एखाद्या पोलिसाविरुद्ध तक्रार असेल, तर पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि आवश्यकतेनुसार वरिष्ठ स्तरावरील यंत्रणांकडे दाद मागण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. तक्रारींचे निवारण होत नसेल, तर कायदेशीर मार्गाने पुढे जाता येते. मग कायदा हातात घेऊन मारहाण करण्याची गरजच काय? लोकशाहीत तक्रारीचा मार्ग असतो; रस्त्यावरच न्यायालय भरवण्याची पद्धत नसते.
दरम्यान, या घटनेत एका पत्रकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्षाचा सहभाग असल्याचीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी किंवा ठोस पुरावे समोर येईपर्यंत कोणाचेही नाव घेऊन निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. संबंधित व्यक्तीचा सहभाग आढळल्यास त्याच्यावरही नियमानुसार कारवाई झाली पाहिजे.
कालच पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांची मुदखेड येथून बदली करून त्यांच्या जागी गणेश कराड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. शेवटी प्रश्न एकच आहे कारवाई फक्त गणवेशातील व्यक्तीवरच होणार, की कायदा हातात घेणाऱ्यांनाही त्याच गांभीर्याने जाब विचारला जाणार? पोलीस कर्मचाऱ्याची चूक असेल तर त्याची चौकशी करा; त्याच्यावर हल्ला झाला असेल तर हल्लेखोरांवरही कायदेशीर कारवाई करा. आणि वाळूच्या कथित व्यवहाराचा या प्रकरणाशी संबंध असेल, तर त्याचीही पाळेमुळे खणून काढा. अन्यथा निलंबनाची कारवाई दिसेल, पण सत्य मात्र पुन्हा एकदा फाईलच्या धुळीत गाडले जाईल.
पत्रकारितेच्या नावाखाली कोणी वाळूच्या कथित धंद्याशी संबंधित असेल, तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे. कारण पत्रकारितेचा धर्म प्रश्न विचारणे हा आहे, कोणत्याही बेकायदेशीर व्यवहाराला संरक्षण देणे नव्हे. कायद्यापुढे गणवेश, संघटनेचे पद आणि पत्रकारितेचा मुखवटा कशालाही विशेष सूट नसावी!
संबंधित बातमी ….
नांदेडमध्ये खाकीची ३० किमी अंतरावरून विशेष सेवा! असर्जन चौकात वाळू माफियांकडून पोलिसाची धुलाई

Post Views: 8
