![]()
हिंगोली तालुक्यातील पोलिस पाटील पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून पैशाची मागणी करीत असल्याच्या आरोपावरून हिंगोली तहसील कार्यालयातील शिपायास तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी ता. ७ काढले आहेत. हिंगोली जिल्हयात पोलिस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या भरती प्रक्रियेवर जिल्हाधिकारी गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी कांबळे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, विकास माने, प्रतिक्षा भुते यांच्या पथकाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. या शिवाय या भरती प्रक्रियेत कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, हिंगोली तहसील कार्यालयातील शिपाई भिमा रंगनाथ झेंडे हे पोलिस पाटील पदाची प्रक्रिया सुरु असतांना उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून या पदावर निवड करण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याची बाब समोर आली होती. त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. त्या अहवालावरून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हिंगोली तहसील कार्यालयातील शिपाई झेंडे यास निलंबीत केले आहे.
हिंगोलीच्या तहसील कार्यालयातील शिपाई तडकाफडकी निलंबीत:पोलिस पाटील नियुक्तीसाठी पैशाची मागणी करीत असल्याचे उघड
