![]()
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) निमित्ताने एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या कडक नियमावलीचा फटका महिला उमेदवारांना बसला असून, गळ्यातील मंगळसूत्र आणि दागिने काढल्याशिवाय प्रवेश नाकारल्याने केंद्रांवर मोठ
.
आज रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या सत्रात ही परीक्षा आयोजित करण्यात आली. परीक्षेसाठी सकाळी ७ वाजेपासूनच रिपोर्टिंग टाईम देण्यात आला होता. केंद्राच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरद्वारे कडक तपासणी सुरू होती. यावेळी कोणत्याही धातूच्या वस्तूंना परवानगी नसल्याचे सांगत सुरक्षा रक्षकांनी महिलांना दागिने काढण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे, गळ्यातील मंगळसूत्र घातले असेल तर परीक्षा देऊ दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका काही केंद्रांवर घेतल्याने महिला परीक्षार्थींची तारांबळ उडाली.
एकट्या आलेल्या महिलांचे हाल
ज्या महिलांसोबत त्यांचे पती किंवा नातेवाईक होते, त्यांनी आपले दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र, लांबून प्रवास करून एकट्या आलेल्या महिलांसमोर मोठे संकट उभे राहिले. लाखो रुपयांचे दागिने आणि मंगळसूत्र कोणाच्या भरवशावर ठेवायचे? हा प्रश्न त्यांना पडला. काही महिलांना वेळेवर दागिने ठेवण्याची सोय न मिळाल्याने केंद्रावरच रडकुंडीला येण्याची वेळ आली.
आधी का सांगितले नाही? परीक्षार्थींचा सवाल
“आम्ही परीक्षेसाठी एवढी तयारी करतो, पण केंद्रावर आल्यावर असा अनुभव येईल असे वाटले नव्हते. सुरक्षेचे नियम पाळायला आमची हरकत नाही, मात्र मंगळसूत्र आणि दागिन्यांबाबत अशा सूचना प्रवेशपत्रावर किंवा आधीच स्पष्टपणे का देण्यात आल्या नाहीत?” असा संतप्त सवाल अनेक महिला परीक्षार्थींनी उपस्थित केला आहे. ऐन परीक्षेच्या ताणाखाली असताना अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मानसिक मनस्ताप झाल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
