![]()
महानगरपालिकेत ५७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता सत्तावाटपाची सूत्रे हलवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाने गटनेतेपदी ओबीसी प्रवर्गातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रा. गोविंद केंद्रे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीद्वारे भाजपने आगामी राजकारणासाठी सोशल इंजिनिअरिंगचा पॅटर्न राबवण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असून, त्यापूर्वी झालेल्या या निवडीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विभागीय आयुक्तांकडे ५७ नगरसेवकांची अधिकृत नोंदणी पार पडली असून, गटनेतेपदाच्या माध्यमातून पूर्व विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने भाजप नेहमीप्रमाणे एखादे धक्कातंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. पक्षाने महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी चार अर्ज घेतले असून, उमेदवाराच्या नावाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. महापौरपद बाहेरून पक्षात आलेल्या उमेदवाराला द्यायचे की निष्ठावंत कार्यकर्त्याला, यावर कोअर कमिटीत मोठा खल झाला. अनेक संधी उपभोगलेल्या आयात उमेदवारांपेक्षा, या वेळी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी, असा मतप्रवाह प्रबळ ठरला आहे. गोविंद केंद्रे : गाव ते नगरसेवकपद नांदेड जिल्ह्यातील निचपूर (ता. किनवट) येथील शाखाध्यक्ष (१९८८-९०) म्हणून राजकीय प्रवासाची सुरुवात करणारे प्रा. गोविंद केंद्रे १९९३ पासून शहरात वास्तव्यास आहेत. मेहेरसिंग नाईक महाविद्यालयात प्राध्यापक असलेले केंद्रे यांच्या पत्नी विमल केंद्रे यापूर्वी भाजपच्या नगरसेविका होत्या. मंत्री अतुल सावे यांच्या मतदारसंघातील ते अत्यंत विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. भाजपचे सोशल इंजिनिअरिंग निवडणूक प्रचारादरम्यान ओबीसी नेत्यांना काहीसे लांब ठेवणाऱ्या भाजपने आता सत्तेच्या पदांमध्ये या घटकाला स्थान देणे सुरू केले आहे. ओबीसीमधील मोठ्या घटकाला डावलणे शक्य नसल्याचे ओळखूनच गटनेतेपदी प्रा. केंद्रे यांची वर्णी लागली आहे. निवडणुकीत भाजपने मायक्रो ओबीसी कार्ड खेळले होते. प्रभाग रचनेप्रमाणेच आता पदे देतानाही भाजप सोशल इंजिनिअरिंगचा तोच पॅटर्न राबवताना दिसत आहे.
भाजप गटनेतेपदाच्या नियुक्तीवरून पक्षाने सोशल इंजिनिअरिंग साधले:ओबीसी प्रवर्गाचे प्रा. गोविंद केंद्रे गटनेते, महापौरपदाची उत्सुकता
