दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, मग बॅकलॉग परीक्षेचे शुल्क का?

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, मग बॅकलॉग परीक्षेचे शुल्क का?

विद्यापीठाच्या परिपत्रकाच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कुलगुरूंना निवेदन

नांदेड, दि. ७ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत विद्यापीठाने परिपत्रक काढले असतानाही काही महाविद्यालयांकडून बॅकलॉग परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. यामुळे विद्यापीठाच्या शुल्कमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कोणत्या पद्धतीने केली जात आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज परीक्षा शुल्काशिवाय स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, काही महाविद्यालयांमध्ये बॅकलॉग परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र शुल्क घेतले जात असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने म्हटले आहे.

याबाबत संबंधित महाविद्यालयांकडे विचारणा केली असता, ‘विद्यापीठाने बॅकलॉग परीक्षेचे शुल्क घेण्यास सांगितले आहे,’ असे उत्तर दिले जात असल्याचा दावा संघटनेने निवेदनात केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परिपत्रकात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली शुल्कमाफी बॅकलॉग परीक्षेलाही लागू आहे की नाही, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टता करणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त परीक्षा शुल्काचा भार पडू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने स्पष्ट आदेश जारी करावेत. तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून बॅकलॉग परीक्षेचे शुल्क आकारले जात असल्यास ते त्वरित थांबवून संबंधित विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. शुल्क आकारणी थांबवून विद्यार्थ्यांना दिलासा न दिल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही फैसल सिद्दीकी यांनी दिला आहे.

यावेळी निवेदन देताना अमितसिंघ सूखमणी, सय्यद नावेद, चंदू ठाकूर, मोहसीन खान, शेख मेहराज, निखिल गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *