प्रशासकराज संपणार:नागपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी उद्या निवडणूक; 6 व्यांदा महिला नगरसेवकास मिळणार संधी




नागपूर महानगरपालिकेत ५ मार्च २०२२ पासून सुरू असलेले प्रशासकराज शुक्रवारी (६ फेब्रुवारी) संपुष्टात येण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर (महिला) आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून, १६ स्थायी समिती सदस्यांची नियुक्तीही केली जाईल. नागपूर महापालिकेची मुदत ४ मार्च २०२२ रोजी संपल्यानंतर ५ मार्च २०२२ पासून प्रशासक आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे मनपाची सूत्रे होती. त्यानंतर डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. आता त्यांच्या प्रशासकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून नगरसेविका नीता ठाकरे यांनी, तर काँग्रेसकडून नगरसेविका स्नेहल ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका लीला हाथीबेड आणि काँग्रेसचे नगरसेवक विवेक निकोसे यांच्यात लढत होईल. भाजपला १०२ सदस्यांचे बहुमत असल्याने नीता ठाकरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्या नागपूरच्या सहाव्या महिला महापौर ठरतील. यापूर्वी कल्पना पांडे, वसुंधरा मासुरकर, माया इवनाते, अर्चना डेहनकर आणि नंदा जिचकार यांनी नागपूरच्या महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. विशेष सभेला सुरुवात झाल्यानंतर पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्जांची छाननी करतील. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. मनपाच्या निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेले सूचनापत्र आणि निवडून आल्याचे प्रमाणपत्र (झेरॉक्स प्रत) सोबत आणण्याचे आवाहन केले आहे. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *