![]()
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात काल एक अजब राजकीय पेच पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी आणि मोहोळ तालुक्यात घेतलेल्या सभांमध्ये चक्क विरोधी पक्षांच्या आमदारांची उपस्थिती आणि त्यानंतर स्वतःच्याच उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन केल्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती गणाच्या निवडणुकीवरून सध्या शिवसेनेत मोठा गोंधळ उडाला आहे. येथे शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील यांनी धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे, तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रगती दगडे रिंगणात आहेत. युती असूनही एकाच गणातून दोन उमेदवार उभे राहिल्याने प्रचाराच्या सुरुवातीलाच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? कालच्या सभेत भाषण सुरू असताना स्थानिक नेते संतोष पाटील यांनी एकनाथ शिंदेंना एक चिठ्ठी दिली. ती वाचताच शिंदेंनी तुतारी चिन्हावरील उमेदवाराचा प्रचार केल्याचे दिसून आले. मात्र, याच सभेत “शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका, आघाडीचा धर्म पाळा,” असे थेट आवाहन त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. “नरखेड गटात ज्योत्स्ना पाटील या आपल्या अधिकृत उमेदवार नाहीत. येथे महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे.” असे शिंदे म्हणाले. आपल्याच पक्षाच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन पक्षप्रमुखांनी केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेतेच स्वतःच पक्षाच्या चिन्हावरील उमेदवाराला मत देऊ नका, असे सांगत असल्याने कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ज्योत्स्ना पाटील यांचा पत्ता का कट झाला? या गोंधळावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ज्योत्स्ना पाटील या मुळच्या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या आहेत. शिवसेनेने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी त्या पाळल्या नाहीत. परिणामी, आघाडीचा धर्म राखण्यासाठी शिंदेंनी प्रगती दगडे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. बार्शीत दिलीप सोपलांना ‘ऑफर’ एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात केवळ वादच नव्हे तर मोठे राजकीय ‘संकेत’ही पाहायला मिळाले. बार्शी येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल चक्क शिंदेंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिंदेंनी त्यांना मंचावरूनच थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली, ज्यामुळे बार्शीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मोहोळ येथे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून एकनाथ शिंदेंचे स्वागत केले. यामुळे राजकीय सीमा पुसट होत असल्याचे पाहायला मिळाले.
धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मतदान करू नका:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भरसभेत धक्कादायक वक्तव्य, सोलापुरात अजब राजकीय पेच
