कुसुमकोटमध्ये माजी विद्यार्थी शाळांच्या मदतीसाठी पुढे:'मेळघाट शिक्षण लोकसंवाद' अभियानांतर्गत घेतला पुढाकार
![]()
मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील शाळांच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘खोज’ संस्थेच्या ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रमांतर्गत नुकताच मोंटफोर्ट शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील सर्व शाळांच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. ‘खोज’ संस्थेने हाती घेतलेला ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रम केजी ते पीजी शिक्षण भक्कम आणि दर्जेदार असावे यासाठी प्रयत्न करतो. या उपक्रमाचा उद्देश गरीब, आदिवासी आणि वंचित मुलांच्या स्वप्नांना शिक्षणाद्वारे नवी दिशा देणे हा आहे. शिक्षणातून केवळ व्यक्तीचे जीवन बदलत नाही, तर संपूर्ण समाजाचे जीवन उज्वल होते, या विचाराने हे अभियान चालवले जात आहे. आजचे शिक्षण उद्याचा सक्षम मेळघाट घडवते, या हेतूने कुसुमकोटमधील मोंटफोर्ट कॉन्व्हेंटमधील कार्यक्रम याच अभियानाचा एक भाग होता. या कार्यक्रमात मेळघाटच्या आदिवासी समुदायातील मुला-मुलींना जिल्हा परिषद, आश्रम शाळा व इतर शाळांमधून दर्जेदार शिक्षण कसे मिळेल आणि त्यांची स्वप्ने कशी पूर्ण होतील, यावर भर देण्यात आला. ॲड. ब्रदर जोस, सदया फाउंडेशन, उन्नती संस्था, एकलव्य संस्था, दयासागर हॉस्पिटल आणि इतर संस्था-संघटनांनी यात सहभाग घेतला. मेळघाटच्या अनेक गावांतून विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, ज्यामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. यापुढेही हा कार्यक्रम सतत सुरू ठेवण्याची ग्वाही देत सर्वांनी तशी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिताताई बेठेकर यांनी केले. या कार्यक्रमात ॲड. ब्रदर जोस यांच्यासह शिक्षक स्वामी डुसके, यशवंत गौड, झारेकर, रामेश्वर फड, रणजीत घोडेस्वार, बन्सी परते, वानखडे, उषाताई बेलसरे, लक्ष्मण बेलसरे, सोनुताई भुसारे आणि अविनाश बेलसरे आदी उपस्थित होते.
