औंढ्यात अनुदानासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे भिकमांगो आंदोलन:एक तासात जमा झाले 2500 रुपये

0
ezgifcom-resize-2_1770289233.gif




औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना योजनांच्या अनुदानासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. ५ औंढा नागनाथ येथील बसस्थानकावर भिकमांगो आंदोलन केले. त्यानंतर एक तासात जमा झालेले २५०० रुपये पंचायत समितीसमोर टाकून दिले. औंढा नागनाथ तालुक्यात पंचायत समिती कार्यालयाकडून लाभार्थ्यांना योजनांचे अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सिंचन विहीर, जनावरांचा गोठा यासह इतर योजनांच्या अनुदानाचा समावेश आहे. योजनांची कामे पूर्ण झाल्यानंतरही अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली झटे यांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मात्र त्यानंतरही अनुदान देण्यात आले नाही. दरम्यान, अनुदानाची रक्कम देण्यासा्ठी पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. सदर मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे आज ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकावर भिकमांगो आंदोलन सुरु केले. यावेळी सुनील काळे, अनिल कदम, बबन इघारे, सुदामराव वैद्य, अन. डी. नागरे, रानोजी आव्हाड, विष्णू खटके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सकाळी सुरु केलेल्या या आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी साहेब पैसे घ्या पण अनुदान द्या अशी मागणी करणारे टी शर्ट परिधानकरून सहभाग नोंदविला होता. दरम्यान, सकाळी १० ते आकरा यावेळेत झालेल्या या आंदोलनात २५०० रुपये जमा झाले होते. सादर रक्कम औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयासमोर उधळून अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला. पैसे द्या पण अनुदान द्या अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनाची माहिती मिळताच औंढा नागनाथ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतल्याचे चित्र होते. या संदर्भात औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा- माऊली झटे औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल झाला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांची पाठराखण केली जात आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed