'ते पन्नास दिवस' कादंबरीची प्रेरणा स्थलांतरित मजुरांचा संघर्ष:प्रगतिशील लेखक संघाच्या 'गाठभेट लेखकाशी' कार्यक्रमात पवन भगत यांचे मत

0
d26d99b0-2898-47c6-a13d-a6f175c938a8_1778425457020.jpg




अमरावती: ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे लेखक पवन भगत यांनी सांगितले की, कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या वाट्याला आलेला जीवघेणा संघर्षच त्यांच्या कादंबरीची प्रेरणा ठरला. प्रगतिशील लेखक संघाच्या चांदूर रेल्वे शाखेतर्फे आयोजित ‘गाठभेट लेखकाशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. करोना महामारीच्या काळात भारताच्या विविध महानगरांत स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल अत्यंत वेदनादायी होते. बंद पडलेली उद्योग साखळी आणि विस्कटलेली सामाजिक वीण मन अस्वस्थ करणारी होती. भीषण परिस्थितीत अडकलेल्या मजुरांचे जत्थे शहरी भाग सोडून आपल्या गावी जातानाचे दृश्य हृदय हेलावून टाकणारे होते. ही परिस्थिती मी स्वतः अनुभवत होतो, त्यामुळे यातून आलेल्या अस्वस्थतेतून ‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे लेखन अगदी झपाटल्यागत माझ्या हातून झाले, असे मत पवन भगत यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम येथील कॉ. प्रा. शिवदास उटाणे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव तुकाराम भस्मे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एआयएसएफच्या राज्य सचिव आणि ही कादंबरी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कायम राखली जावी यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या रणरागिणी प्रतीक्षा ढोके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी.ए. भाग दोनच्या अभ्यासक्रमात सन २०२२ मध्ये समाविष्ट केलेली ही कादंबरी ऐन परीक्षेच्या काळात काही आक्षेप घेऊन रद्द करण्यात आली होती. एआयएसएफच्या राज्य सचिव कॉ. प्रतीक्षा ढोके यांनी या विरोधात न्यायालयात दाद मागितली आणि न्यायालयाने ही कादंबरी पूर्ववत कायम ठेवण्याचा निर्णय दिला. या पार्श्वभूमीवर ‘ते पन्नास दिवस’ चे लेखक पवन भगत यांच्याशी ‘गाठभेट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पवन भगत पुढे म्हणाले की, दुःख विकून प्रसिद्धी मिळवणे ही माझ्या मनाला न पटणारी बाब आहे. कोरोना काळातील उन्हातान्हात शेकडो किलोमीटर पायपीट करणारे मजूर आपल्या कच्च्याबच्च्यांना घेऊन जी परिस्थिती भोगत होते, ते मला प्रचंड अस्वस्थ करत होते. यातूनच या कादंबरीचे लेखन झाले. यात मला जे दिसले, तेच आलेले आहे. यामुळे कोणाला ते आक्षेपार्ह वाटत असेल तर आपला नाइलाज आहे. पण लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने घातक असल्याची भावना यावेळी पवन भगत यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी कवी शिवा प्रधान, सतीश चौधरी, विनोद जोशी, भूषण नाचवणकर, राम जोशी, जयप्रकाश चोरडिया आणि समविचारी संघटनांचे अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed