चिखलदरा अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के:सर्व 17 दृष्टीबाधित विद्यार्थी उत्तीर्ण, यशाची परंपरा कायम

0
cce5070d-e0f5-4a7a-8cce-838bae02ab4c_1778425795975.jpg




चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित निवासी अंध विद्यालयाने यावर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व १७ दृष्टीबाधित विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आकाश वाघमारे याने ८५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, ऋतुजा नांदुरकर आणि आरती गायकवाड यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवले. माधव भोंग याला ८० टक्के, गौरवी इंगळेला ७८.६० टक्के, तर रितेश मावसकर याला ७६.८० टक्के गुण मिळाले. नामदेव शिरसाठ आणि कृष्णा पवार या दोघांनी ७६.६० टक्के गुण संपादन केले. सरस्वती भिलावेकर (७५.२०%), धोंडीबा शेडगावे (७४.८०%) आणि कृष्णा शिंदे (७४.६०%) यांनीही चांगले गुण मिळवले. लहुजी गायकवाड, सरस्वती गंभीरे, राखी भिलावेकर, लालचंद जावरकर, रामनाथ सातपुते आणि संजना मावसकर यांनीही परीक्षेत यश मिळवले. राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ), अमरावती ही संस्था गेल्या चार दशकांहून अधिक काळ दिव्यांगांच्या शिक्षण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. चिखलदरा येथील हे निवासी अंध विद्यालय महाराष्ट्रातील दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण देणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, पौष्टिक आहार, ब्रेल साहित्य, संगणक प्रयोगशाळा, संगणक प्रशिक्षण, जीवन कौशल्य विकास आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कलोती, कार्याध्यक्ष रामराव पोकळे, सचिव सुधाकर पोकळे, मानद सचिव किशोर वैद्य तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापिका प्रीती गजानन सुने आणि ज्येष्ठ शिक्षिका उषा राजेश मांगलेकर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयाने २०१७-१८ पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात केली असून, तेव्हापासून आजतागायत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या सातत्यपूर्ण यशाची दखल घेऊन, संस्थेच्या विनंतीनुसार महाराष्ट्र शासनाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यालयात अकरावी वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed