![]()
पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला हल्ला असल्याचा आरोप शहजाद पूनावाला यांनी केला असून, संबंधित कार चालकाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ तहसीन पूनावाला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक पांढरी कार थेट त्यांच्या आईला धडक देताना आणि त्यानंतर चालक घटनास्थळावरून पळ काढताना स्पष्ट दिसत आहे. जाणूनबुजून अंगावर कार घातली शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर लिहिले की, काही तासांपूर्वी एका घृणास्पद व्यक्तीने जाणूनबुजून माझ्या आईच्या अंगावर कार घातली. त्या गंभीर जखमी झाल्या असून लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. कार चालक पळून गेला. कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा.या प्रकरणात त्यांनी पुणे पोलिसांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग करत, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, पूनावाला यांच्या आई ड्रायव्हर आणि सहाय्यकासोबत बाहेर गेल्या होत्या. गॅस भरण्यासाठी त्या एका ठिकाणी थांबल्या असताना, एका कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि चालक फरार झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या CCTV फुटेजवरून हा प्रकार अपघात नसून मुद्दाम केलेला हल्ला असल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय तहसीन पूनावाला यांनी सांगितले की, आई ज्येष्ठ नागरिक आहे. गॅस भरताना ती बाजूला उभी होती, तेव्हा कारने तिला धडक दिली. हे सर्व मुद्दाम केल्यासारखे वाटते. त्यांनी आईचा एक्स-रे रिपोर्टही शेअर केला असून, त्यामध्ये हाड मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. आईवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून आयुष्यभरासाठी रॉड टाकावी लागेल. त्यांनी पोलिस सहआयुक्त आणि उपायुक्तांशी संपर्क साधला असून, हा प्रकार पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांकडून तपास सुरू दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले जात आहेत. आरोपी कार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
पुण्यात भाजप नेत्यांच्या आईला कारची धडक:पूनावाला कुटुंबीयांचा सुनियोजित हल्ल्याचा आरोप, कार चालकाचा शोध सुरू
