पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू:मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश; हडपसर, खराडी, लोणीकंदमध्ये घटना

0
46a60911-540a-46d8-95d4-f8ba22a38c83_1778324009076.jpg




पुणे शहरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हडपसरमधील मगरपट्टा, अहिल्यानगर रस्ता आणि खराडी या भागांत या अपघाताच्या घटना घडल्या. खराडी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार संगीता पांडुरंग कारभारी-पाटील (वय ३९, रा. निर्मल टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास संगीता खराडी परिसरातून जात असताना त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, अहिल्यानगर रस्त्यावर लोणीकंद भागात ट्रकच्या धडकेत शांताबाई रघुनाथ जाधव (वय ७२) या पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई त्यांच्या भावाच्या पत्नीसोबत अहिल्यानगर रस्त्याने जात असताना, लोणीकंद भागात रस्ता ओलांडताना त्यांना ट्रकने धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक एस. वंजारी तपास करत आहेत. तिसरी घटना हडपसरमधील मगरपट्टा भागात घडली, जिथे दुचाकीस्वार जिशान अफसर शेख (वय १९, रा. सादाफ टॉवर, लष्कर) याचा मृत्यू झाला. जिशान रात्री मगरपट्टा परिसरातून जात असताना, त्याची भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. आदळल्याने तो दुचाकीवरून फेकला गेला आणि समोरून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक एन. साने पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed