विकास लवांडे यांच्या अटकेची सकल हिंदू समाजाची मागणी:वाघोली पोलिसांना निवेदन, अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
![]()
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या तात्काळ अटकेची मागणी वाघोली परिसरातील सकल हिंदू समाजाने केली आहे. वारकरी संप्रदाय, कीर्तनकार आणि हिंदू साधूसंतांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वाघोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून, अटक न झाल्यास ११ मे रोजी नगर रोड परिसरात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विकास लवांडे यांनी नुकतेच वारकरी संप्रदाय, साधूसंत आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविषयी आक्षेपार्ह व वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, हिंदू समाजात, विशेषतः वारकरी संप्रदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लवांडे यांच्यावर यापूर्वीही वादग्रस्त विधाने करून समाजभावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारी दाखल असल्याची माहिती निवेदनात नमूद आहे. या प्रकरणी नलिनी वायाळ यांनी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९, ३०२, १९६ (१) (अ) अन्वये गु.र.नं. ०३०८/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अद्याप अपेक्षित कठोर कारवाई झाली नसल्याचे सकल हिंदू समाजाच्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, हे कृत्य केवळ धार्मिक अपमान नसून, यातून परिसरात जातीय तणाव निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता आहे. वेळीच कारवाई न झाल्यास भविष्यात अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाने वाघोली पोलीस प्रशासनाकडे मुख्य आरोपी विकास लवांडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जर १० मे २०२६ पर्यंत आरोपींना अटक झाली नाही, तर सोमवार, ११ मे २०२६ रोजी नगर रोड आणि परिसरात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही बिघाड झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन आणि शासनाची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
