मराठवाडा रस्ते अपघातांनी हादरला:परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पत्नी-पत्नीचा जागीच मृत्यू; लातूरच्या अपघातात 1 जन बेपत्ता

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-09t192340719_1778334864.jpg




मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. पहिली घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी शिवारात घडली, जिथे एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर-अंबाजोगाई रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरील दुसरी व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. या विचित्र अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला जात असून, या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 61 वर यशवाडी शिवारात एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत दाम्पत्य हे मूळचे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथील रहिवासी होते. ते यशवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते आणि दर्शन घेऊन आपल्या घराकडे परतत असताना समोरून येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडक बसताच दोघांनीही घटनास्थळीच प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी ती सुरळीत केली. सध्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. लातूर जिल्ह्यात भरधाव कारची दुचाकीला धडक लातूर जिल्ह्यातील अहमदपूर-अंबाजोगाई रस्त्यावरील काजळ हिप्परगा गावाजवळ एक भीषण अपघात झाला. एका भरधाव ब्रेझा कारने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला चुकीच्या बाजूने (राँग साईड) जाऊन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटरसायकल चालक अंदाजे ५० ते ६० फूट दूर फेकला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, कार चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अपघातात तो स्वतः किरकोळ जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, या अपघातानंतर मोटरसायकलवर मागे बसलेली व्यक्ती बेपत्ता झाली असून, स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा आणि परिसरात तिचा शोध सुरू केला आहे, मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती देऊनही पोलीस बराच वेळ घटनास्थळी न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. अखेर स्थानिक लोकांनीच मृतदेह आणि जखमीला रुग्णालयात हलवले. उशिराने दाखल झालेल्या पोलिसांनी आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed