![]()
तिवसा तालुक्यातील मोझरी येथे प्रवाशांच्या हक्कासाठी प्रहार संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आश्रम, महासमाधी, अनेक शैक्षणिक संस्था आणि आयुर्वेदिक रुग्णालये असलेल्या मोझरीमध्ये दररोज हजारो भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगार प्रवास करतात. मात्र, येथे प्रवाशांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. मोझरी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, सार्वजनिक प्रवासाचे मुख्य साधन एसटी बस आहे. परंतु, अमरावती बस डेपो अंतर्गत येणाऱ्या अनेक बसेस मोझरी येथे थांबत नाहीत. तसेच, मोझरी आणि तिवसा येथील प्रवाशांना वाहक आणि चालकांकडून सातत्याने हीन वागणूक दिली जाते. अधिकृत थांबे असतानाही अनेक बस मोझरी व तिवसा येथे न थांबवता बायपासने धावतात, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून, याबाबत वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते संजय देशमुख यांनी मोझरी एसटी स्टँडवर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. उपोषणाची दखल घेत महामंडळाचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार आणि जयदीप घोडे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. त्यांनी प्रवाशांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवली असून, येत्या काळात अनेक सुधारणा दिसून येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सुरेंद्र देवगडे, कपिल उमप, इर्शाद बेग, योगेश लोखंडे, हेमंत तायडे, प्रेमानंद कांडलकर, अशोकराव लांजेवार, शरद खारोडे, श्याम काळकर, राजाभाऊ आंबेडकर, मोहन लोखंडे, विलास कांदळकर, मंगेश वानखडे, प्रशांत राऊत, नवीन कोचर, अमोल बेलसरे, मनोहर पुरी, नरेंद्र काकडे, अनिल मेश्राम आणि विवेक बेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्यांची दखल घेत एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. चालक आणि वाहकांच्या वागणुकीत सुधारणा करण्यासाठी अमरावती आणि तिवसा येथील पंचवटी चौकात जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक चालकाच्या लॉगशीटवर मोझरी बायपासने न जाता मोझरी व तिवसा थांब्यांवर बस थांबवून प्रवाशांना चढू देण्याबाबत लेखी सूचना दिल्या जातील. तसेच, मोझरी बस स्टँडवर दोन जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या उपाययोजना त्वरेने लागू केल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मोझरीत प्रहार संघटनेचे उपोषण सुरू:एस.टी. बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल, महामंडळाला जाग
