कॉर्पोरेट जिहाद:41 दिवसांपासून फरार निदा खानला नाशिकच्या एका राजकीय पदाधिकाऱ्यानेही दिला होता आश्रय

0
new-project-2026-05-09t064208401_1778308537.jpg




टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात 25 मार्चपासून 7 मेपर्यंत (तब्बल 41 दिवस) फरार निदा खानच्या अटकेमुळे अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येणार आहेत. यात तिचा मलेशियातील संपर्क, तेथील मानवी तस्करीचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर निदाला जुन्या नाशिकमधील एका राजकीय पदाधिकाऱ्याने आश्रय दिला होता. हा पदाधिकारी एका राष्ट्रीय पक्षाचा असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या रॅकेटमधील मुख्य आरोपी दानिश शेख, तौसिफ खान आणि इसाक कुरेशी यांच्याशी निदाचे लागेबांधे असून, तिने केवळ धर्मांतरणासाठी त्यांना सक्रिय सहकार्यच केले नाही, तर पीडित कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या जाळ्यात ज्या सहा महिला कर्मचारी अडकल्या होत्या, त्यातील दोघींवर मलेशियाला जाण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांचे धर्मांतरण करून कागदपत्रांसह सर्व तयारी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामागे नेमके प्रयोजन काय आणि यामागे कोणते आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय आहे, या दिशेने आता पोलिसांचा अत्यंत सखोल तपास करावा लागणार आहे. मानवी तस्करीचे नेटवर्क पोलिसांनी हस्तगत केलेल्या डेटावरून आणि चॅट्सवरून स्पष्ट झाले आहे की, टीसीएसमधील सहापैकी दोन पीडितांना मलेशियाला पाठवण्याची तयारी सुरू होती. यामागे केवळ धर्मांतरण नसून, मानवी तस्करीचे (ह्युमन ट्रॅफिकिंग) मोठे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असल्याचे आरोपींच्या परस्पर संभाषणामधून समोर आले आहे. निदाच्या मावशीवर नजर ठेवल्याने पोलिस पोहोचले थेट मतीनपर्यंत फरार निदा खानच्या अटकेसाठी नाशिक शहर पोलिसांनी तिचा ‘फिल्मी स्टाइल’ पाठलाग (चेस) केला. मुंब्र्यातील एका सीसीटीव्ही फुटेजची त्यांना मदत झाली. ती मावशी नूरजहाँसोबत फिरताना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. ते पाहून पथकाने मावशी आणि तिच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक मोबाइल नंबरवर नजर ठेवत तिचा माग काढला. ती सासरी मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तिच्या पतीची चौकशी केली. त्या चौकशीत ती मावशीकडे असल्याचे समजले, मात्र पथक पोहोचण्यापूर्वीच मावशी आणि निदा दोघी फरार झाल्या होत्या. दहा दिवसांपूर्वी पोलिसांना टीप मिळाली की, निदा तिची आई, भाऊ आणि मावशीसोबत संभाजीनगरमध्ये वास्तव्यास आहे. पथकाच्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी आठ दिवस पाळत ठेवत स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे ऑपरेशन फत्ते केले. संभाजीनगरातून निसटली असती तर निदा हैदराबादला जाणार होती आणि तिला शोधणे कठीण झाले असते. गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक महिन्यापासून या प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण करत होते, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed