संग्रामबापूंनी केलेली शाईफेक अगदी योग्यच:ही शाईफेक नसून दुखावलेल्या भावनांचा उद्रेक, धर्माविरोधात बोलायला यांना कोण प्रवृत्त करते?-संग्राम जगताप
![]()
ज्या लोकांनी धर्मांकरता पूर्ण जीवन समर्पित केले. भगव्या ध्वजा करता ज्यांनी स्वत:चे जीवन समर्पित केले आहे त्याच्यावर कुठेच नसणाऱ्या पक्षाचे लोकं उठतात आणि टीका करतात, आणि घुसखोर ‘हभप’ म्हणत एक यादी वाचून दाखवतात यामुळे हभप संग्रामबापू भंडारे यांनी त्यांच्यावर जी शाईफेक केली ती अगदी योग्य आहे, आम्ही त्यांचे समर्थन करतो, त्यांनी योग्य भूमिका घेतली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. संग्राम जगताप म्हणाले की, संग्रापबापू भंडारे यांचे नाव घेतले म्हणून त्यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केली नाही. तर ते ज्यांना आदर्श मानतात, त्या लोकांबद्दल लवांडे यांनी वक्तव्य केल्याने बापूच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी आज आपला निषेध व्यक्त केला. या लोकांना धर्माविरोधात कोण बोलायला लावते हे पाहिले पाहिजे. या घटनेने लवांडेंची भूमिका बदलणार नाही- दानवे या घटनेवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, विकास लवांडे हे योग्य भूमिका मांडत आहेत. कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भाजपचे अनेक कार्यकर्ते वारकरी संप्रदायात घुसले आहेत. वारकरी संप्रदाय काय राजकीय पक्षाचा प्रचार करा म्हणून सांगतो का? असा सवाल दानवे यांनी केला आहे. लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. वारकरी संप्रदाय काय शाईफेक करण्यास सांगतो का? वारकरी विचार हा असा नाही. शाईफेक केल्याने विकास लवांडे यांची भाषा किंवा विचार बदलतील असे मला वाटत नाही. रोहित पवारांचे ट्विट काय? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज दुपारपर्यंत FIR दाखल झाला नाही तर संध्याकाळी मी स्वतः पोलिस स्टेशनला जाणार… थोर संतांनी दाखवलेला बंधुभावाचा आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार हाच खरा महाराष्ट्र_धर्म असून कोणत्याही कट्टरवाद्यांना, गुंडापुंडांना आणि शिव्या देणाऱ्या मनुवाद्यांना हा विचार आम्ही पुसू देणार नाही…! भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी.. असे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांनी म्हटल्याचे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.
नेमके काय घडले? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आज हभप संग्राम भंडारे व काही गोरक्षकांनी आज सकाळी 10 च्या सुमारास शाईफेक करण्यात आली. विकास लवांडे गत काही दिवसांपासून वारकरी संप्रदायातील घुसखोरांचा मुद्दा लावून धरला होता. त्यांनी या प्रकरणी घुसखोर ‘हभप’ची एक यादीही जाहीर केली होती. यामुळे चिडलेल्या संग्राम भंडारे व त्यांच्या समर्थकांनी आज त्यांच्यावर हल्ला करून शाईफेक केली. या घटनेचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत.
