![]()
खरीप हंगामातील धानाचे थकीत चुकारे, बोनस आणि वीज जोडणी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवरून भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत (जिल्हा भंडारा) आक्रमक झाला आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारला (ता.०३) लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले असून, १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. दिलेल्या निवेदनाद्वारे भारतीय किसान संघाने प्रामुख्याने सरकारचे लक्ष वेधले असून, त्यात खरीप हंगाम २०१५-१६ मधील धानाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, ते तात्काळ देण्यात यावेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलवर बोनस न देता, दरवर्षीप्रमाणे हेक्टरी ३०,००० रुपये बोनस जाहीर करावा. ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांना तातडीने कनेक्शन देण्यात यावे. धानाची शासकीय खरेदी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट वाढवून सर्व धानाची खरेदी करावी. खरीप हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप मदत मिळालेली नाही, ती तात्काळ वितरीत करावी. अशा मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, खरीप हंगामातील थकबाकी न मिळाल्यामुळे पुढील हंगामासाठी बळीराजाकडे भांडवल शिल्लक नाही. जर प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या मागण्यांची दखल घेतली नाही, तर भारतीय किसान संघातर्फे मोठे आंदोलन उभारले जाईल आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. यावेळी भारतीय किसान संघाचे दिनेश कापगते, रूग्वेद येवले यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
'धानाचे थकीत चुकारे द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू':भंडाऱ्यात भारतीय किसान संघाचा एल्गार; सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
