नाशिक राष्ट्रवादीचा आधारस्तंभ हरपला:रविंद्र नाना पगार यांचे निधन, पवार कुटुंबीयांचे होते एकनिष्ठ; राजकीय वर्तुळात हळहळ




नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज, 3 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. एक निष्ठावान पदाधिकारी आणि अभ्यासू नेतृत्व गमावल्यामुळे राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पगार यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवार 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता उत्राने (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुमारे 40 वर्षांचा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव असलेले ॲड. रविंद्र नाना पगार 2012 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत होते. शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज नेत्यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही कार्य केले होते. तसेच आपल्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला त्यांनी युवक काँग्रेस आणि ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदही अत्यंत यशस्वीरीत्या भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून अनुभवी नेतृत्व राहिलेल्या ॲड. रविंद्रनाना पगार यांनी, 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थनार्थ पहिला मेळावा घेत राष्ट्रवादीच्या जडणघडणीत ऐतिहासिक योगदान दिले होते. अलिकडच्या काळात अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, पगार यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटना एकसंध ठेवत या नेत्यांना खंबीर साथ दिली होती. अशा या निष्ठावान आणि अनुभवी नेत्याच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *