![]()
महापौरपदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक होणार असली तरी या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याचे चित्र 3 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्पष्ट होईल. दुपारी 2 पर्यंत अर्जासाठी अंतिम मुदत आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असून पक्षाच्या 16 महिला नगरसेविका पात्र आहेत. मात्र, यात प्रामुख्याने तीन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. वरिष्ठ पक्षनेत्यांची पसंती तीनपैकी कोणाला, याविषयीच आता उत्सुकता वाढली आहे. Q : भाजपकडे बहुमत असताना महापौरपदाची निवडणूक होणार का?
A : भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी महापौरपदासाठी महिलांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे एकपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यास निवडणूक घ्यावी लागेल. मात्र, असे होण्याची शक्यता फारच कमी आहे.
Q : भाजपमधूनच एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरल्यास काय?
A : महापौरपदासाठी भाजप गटनेता पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराचे नाव देतील. मात्र, अन्य नाराज उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास गटनेता त्यांना अर्ज माघारीसाठी पक्षातर्फे व्हिप बजावतील. व्हिप बजावूनही संबंधिताने निवडणूक लढवल्यास त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते.
Q : अर्ज माघारीसाठी पक्षासोबत काय तडजोडी केल्या जातील ?
A : नाराजांच्या मनधरणीसाठी त्यांना पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदाची ऑफर दिली जाईल. यात स्थायी समितीसह 10 समित्या असतील.
इनसाइड स्टोरी पालिका निवडणूक भाजपविरोधात लढल्यानंतर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रात आणि राज्यात तीनही पक्ष महायुतीद्वारेच सत्तेत असल्याने नाशिकमध्येही ते एकत्रच असावे असा विचार राज्यस्तरावरून आहे. त्यादृष्टीने नाशिकमध्येही स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदेसेनेच्या कार्यालयात जाऊन नवनियुक्त गटनेते अजय बोरस्ते तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची भेट घेत त्यांना सत्तेत सोबत येण्याचे निमंत्रण दिले.कुठली पदे कुठल्या पक्षाला याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे समजते. दरम्यान, केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोतच. मग सिंहस्थ आणि नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने विचार करता नाशिक पालिकेतही तीनही पक्षांनी सोबतच राहावे, असेच वरिष्ठांचेही मत असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
नाशिकच्या महापौरपदाचा चेहरा 3 फेब्रुवारीला होणार स्पष्ट:पहिल्या दिवशी एकाही इच्छुकाने नेला नाही अर्ज; भाजपच्या 16 नगरसेविका पात्र, अंतिमत: तिघींमध्ये रस्सीखेच
