![]()
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रथमच बहुमताजवळ गेला. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाला सुटले आहे. भाजपमध्ये अनेक प्रबळ दावेदार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. महापौर निवडीवरून भाजपमध्ये तीन गट पडले आहेत. त्यामुळे एकमताने निवड होऊन प्रदेशाकडे नाव पाठवले गेले नाही तर महापौरपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. दरम्यान, इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडला त्याप्रमाणे धक्कातंत्राचा वापर पक्ष करू शकतो. छत्रपती संभाजीनगरची महापालिका अस्तित्वात आल्यापासून प्रथमच भाजपने 57 जागांवर बाजी मारली. भाजप संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ असून बहुमतापासून केवळ एक नगरसेवक कमी आहे. भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी यापूर्वीच 5 नगरसेवक संपर्कात असल्याचे सांगितलेले आहे. महापौर निवडीसाठी स्थानिक स्तरावर कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केणेकर आदी नेतेमंडळी आपला समर्थक नगरसेवक महापौर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तिघांच्या पसंतीत उतरेल अशा एकावर एकमत होऊ शकते. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा निवडून आलेले म्हणतायेत ‘अभी नहीं तो कभी नहीं भाजपचे महापौरपदासाठी सुटलेल्या प्रवर्गातील नगरसेवकांनी आपल्या निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा निवडून आलेले ‘अभी नहीं तो कभी नहीं’ असे समजून तयारी करीत आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून काम करत असल्याने महापौरपदासाठी प्रवर्गाची विचार केला जाणार नाही. त्यामुळे आपल्याला संधी मिळू शकते, असे अनेकांना वाटते. महापौरसाठी अद्याप बैठक नाही महापौरपदासाठी भाजपच्या कोअर कमिटीची अद्याप बैठक घेतलेली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला पक्षाचे प्राधान्य आहे. महापौर हा ठरल्याप्रमाणे भाजपचा होणार आहे. ज्या प्रवर्गासाठी महापौरपद सुटले आहे त्यातूनच महापौर दिला जाईल. – अतुल सावे, बहुजन विकास मंत्री तूर्तास लक्ष ‘झेडपी’कडे तूर्तास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक हे लक्ष्य आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसंबंधी चर्चा नाही. जिल्हा परिषदेसाठी एकूण 54 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. यातील 12 पुरस्कृत निकालानंतर याकडे लक्ष देऊ. – किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप रोष नको म्हणून श्रेष्ठींकडे बोट शहरातील तिन्ही नेत्यांसह शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना भेटून इच्छुक आपल्या नावाच्या विचार व्हावा यासाठी गळ घालत आहेत. प्रत्येक जण महापौरपदासाठी प्रयत्न करतो असे सांगत असले तरी शेवटी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत आहे. ऐनवेळी रोष नको म्हणून नेतेमंडळी खेळी करीत आहेत. पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरणे नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 57 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 5 फेब्रुवारीनंतर भाजपची गट नोंदणी अपेक्षित आहे. दुसरीकडे 33 जागा जिंकलेली एमआयएम 1 फेब्रुवारीला गट नोंदणी करेल. महापौर निवडणुकीसाठी 4 पासून अर्ज वाटप प्रक्रिया महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. विभागीय आयुक्तालयाने ही तारीख जाहीर केली असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती केली आहे. महापालिका नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 व 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत उमेदवारी अर्जांचे वितरण होईल. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मिळतील, तर याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सचिव कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन केले असून याच सभेत अर्जांची छाननी, माघारीची प्रक्रिया आणि त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडेल.
छत्रपती संभाजीनगर महापौरपदासाठी भाजपमध्ये तीन गट:अंतिम निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेणार, भाजप धक्कातंत्राचा अवलंब करणार
