![]()
भरधाव वेगातील कार लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रक व कंटेनरला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सांगलीच्या एका व्यापाऱ्यासह 4 जण ठार, तर 2 जण गंभीर झालेत. लातूर जिल्ह्यातील औसा – तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. सांगली येथील धनराज काशीनाथ जाधव (49) काही कामानिमित्त आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून (एमएच 04 ईजी 7500) लातूरला आले होते. शुक्रवारी रात्री काम आटोपून ते परत निघाले होते. रस्त्यात शिवली येथे जेवण केल्यानंतर ते सहकाऱ्याला सोडण्यासाठी औशाला आले होते. औशानजिक रात्री 10.15 च्या सुमारास त्यांची कार लाकडाने भरलेल्या ट्रक (एमएच 25 यू 0522) व एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) धडकली. त्यात धनराज जाधव यांच्यासह आबासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) व विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) हे 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. लाकडाने भरलेला ट्रकही 100 फूट अंतरावर जाऊन उलटला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना वाहनाबाहेर काढून तत्काळ रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था काहीकाळ विस्कळीत झाली होती. पण पोलिसांनी ती सुरुळीत केली. धनराज जाधव हे सांगली येथील व्यापारी होते. बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने ते औसा तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या व्यवसायाचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. समृद्धी महामार्गावरील अपघातात 3 ठार दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील नाथनगर (वडखा) शिवारात सुसाट कंटेनरने दिलेल्या धडकेत 3 कामगार ठार झालेत. हे कामगार दुभाजकाचे क्रॅश बॅरिअर प्लेट बदलण्याच्या कामावर होते. ते आपले साहित्य घेऊन उभ्या असलेल्या सर्विस ट्रकच्या आडोशाला जेवणासाठी बसले होते. त्याचवेळी कंटेनरने त्यांच्या ट्रकला धडक दिली आणि ते चिरडले गेले. सदर कंटेनर या कामगारांना चिरडल्यानंतर पुढे उभ्या असणाऱ्या एका जेसीबीवर आदळला. या घटनेत इतर 3 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
BMW कार ट्रक, कंटेनरला धडकली:कारमधील चौघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी; औसा – तुळजापूर महामार्गावरील भयंकर घटना
