![]()
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असतानाच, आज नांदेडमध्ये एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे भरदिवसा अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात
.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नांदेडच्या सिडको भागात घडली. जीवन घोगरे पाटील हे परिसरात असताना अचानक एका चारचाकी वाहनातून आलेल्या काही अज्ञात इसमांनी त्यांना गाठले आणि बळजबरीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये अपहरणकर्त्यांची गाडी सुसाट वेगाने निघून जाताना स्पष्टपणे दिसत आहे.
अपहरणकर्त्यांनी घोगरे पाटील यांना अज्ञात स्थळी नेऊन तिथे त्यांना लाकडी दांडके आणि इतर वस्तूंनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीराला मोठ्या दुखापती झाल्या आहेत. मारहाणीनंतर हल्लेखोरांनी त्यांना सोडून दिले. त्यानंतर घोगरे पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, हे अपहरण नेमके कोणत्या कारणातून झाले? वैयक्तिक वैमनस्य की राजकीय वाद? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या संशयास्पद वाहनाचा आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
