गामणे मैदानालगतच्या रस्त्यावर‎चौपाटीला रहिवाशांचा तीव्र विरोध‎:विभागीय अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी दिले निवेदन




प्रतिनिधी | सिडको महिलांसह जेष्ठ नागरिक विद्यार्थी व खेळाडूंची मोठ्या संख्येने नेहमी वर्दळ असलेल्या पाथर्डी फाटा येथील गामणे क्रीडांगण येथे रस्त्यालगत चौपाटी सुरू करण्यास स्थानिक नागरिकांसह शिवसेनेच्यावतीने तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल जाधव, सुदाम डेमसे, रवींद्र गामणे, अजय पाटील यांनी विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांना दिलेल्या निवेदनात आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ३१ मधील मुरलीधरजी गामणे क्रीडांगण, वासननगर या ठिकाणी स्टेट बँक येथील चौपाटी आणण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याची चर्चा आहे. परंतु या भागातील स्थानिक नागरिकांचा या चौपाटीस तीव्र विरोध आहे. या रस्त्यावरून सकाळ-संध्याकाळ अशा दोन्ही वेळा शारदा शाळा ,गुरुगोविंद स्कूल, सेंट फ्रान्सिस स्कूल, डे केअर सेंटर शाळा या भागातील विद्यार्थी तसेच महिला पालक वर्ग नेहमी ये- जा करत असतात. खाद्यपदार्थांच्या उरलेल्या अन्नामुळे मोठी दुर्गंधी निर्माण होईल. या ठिकाणी खेळणे आणि व्यायाम करणे देखील अशक्य होणार आहे. चायनीज गाड्यांच्या परिसरातच अनेक जण मद्यप्राशन करतात. त्यामुळे या मैदानातच मद्यपींचा अड्डा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शांतता भंग होऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढून अशांतता निर्माण होईल, असे निवेदनात नमूद केले आहे. विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक. ^साडेसात एकर जागेत गामणे मैदान आणि क्रीडांगण आहे. शेकडोच्या संख्येने मुले खेळण्यासाठी येतात. ज्येष्ठ नागरिक व्यायामासाठी येतात. महिला वर्ग जॉगिंग साठी येतो. त्यामुळे या परिसरात कोणत्याही प्रकारे चौपाटी सुरू करू नये. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू. -रवींद्र गामणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *