भरत गीते यांनी वर्षभरात उद्योग उभारला:दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; 'अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया' अशी ओळख




दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) उद्योजक भरत गीते यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. गेल्या वर्षी ५०० कोटी रुपयांच्या सामंजस्य कराराची (एमओयू) अवघ्या एका वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गीते यांचा गौरव केला. ‘अ‍ॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस आणि भरत गीते यांच्या भेटीदरम्यान उद्योग उभारणीतील नियोजन, वेगवान अंमलबजावणी, प्रशासन आणि उद्योजकांमधील समन्वय तसेच उत्पादन क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील वाढते महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या उपक्रमांना बळ देणाऱ्या या उपक्रमातून कमी कालावधीत उद्योग उभारणी शक्य असल्याचा प्रेरणादायी संदेश देशभरातील उद्योजकांना मिळाला आहे. फडणवीस यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे उभारण्यात आलेल्या ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज उत्पादन प्रकल्पाने अल्पावधीतच उत्पादन सुरू करत राज्यासमोर एक आदर्श औद्योगिक मॉडेल उभे केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, स्थानिक औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता एका वर्षात प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतरित होऊ शकतो, याचे भरत गीते आणि तौरल इंडिया हे उत्तम उदाहरण आहे. मराठी उद्योजकांमध्ये जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे. त्यांना योग्य धोरणात्मक पाठबळ दिल्यास महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नवे शिखर गाठेल. यावेळी भरत गीते यांनी सांगितले की, तौरल इंडियाने २०१६ पासून औद्योगिक विस्तार करत ऊर्जा क्षेत्र, संरक्षण उत्पादन, आरोग्य उपकरणे तसेच एरोस्पेस क्षेत्रासाठी आवश्यक अचूक अ‍ॅल्युमिनियम कास्टिंग्ज निर्मितीत भरीव योगदान दिले आहे. विविध क्षेत्रांतील या योगदानामुळे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बळ मिळत असून, आर्थिक वाढीस हातभार लागत आहे. गीते यांनी पुढे म्हटले की, उत्पादन क्षेत्र हे मजबूत अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वाहन उद्योग, अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, संरक्षणपूरक उद्योग, कृषी प्रक्रिया आणि उच्च-मूल्य निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र मजबूत झाल्यास राज्याचा औद्योगिक पाया अधिक भक्कम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *