खैरेवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अडीच तास रोखला मुंबई – नाशिक महामार्ग:दोन दिवसांत जिल्हाधिकारी व आदिवासी विकास विभाग आयुक्तांसमवेत बैठक‎




प्रतिनिधी | घोटी चिंचलेखैरे समूहातील खैरेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी एल्गार कष्टकरी कामगार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी मुंबई -नाशिक महामार्गावर घोटी टोलनाक्याजवळ आंदोलन केले. यामुळे अडीच तास महामार्ग पूर्णतः ठप्प झाला होता. मुंबई व नाशिक दोन्ही दिशांना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले, तर यंत्रणांचीही चांगलीच दमछाक झाली. अनेक वर्षांपासून खैरेवाडी येथील रस्ता प्रश्न प्रलंबित असून, यापूर्वीही या मागणीसाठी विविध आंदोलने झाली आहेत. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नद्या-नाले ओलांडून थेट वाडीत जाऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. मात्र असे असतानाही हा रस्ता प्रश्न आजतागायत कागदोपत्रीच अडकून राहिला आहे. या दुर्लक्षाविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एल्गार कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्त्वाखाली हे तीव्र आंदोलन करण्यात आले. घोटी टोलनाक्याजवळ महामार्गावरच ठिय्या देत ग्रामस्थ व संघटनेचे कार्यकर्ते तिरंगा झेंडा हातात घेऊन, वाद्यांच्या गजरात आपल्या मागण्या मांडत होते. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, तर नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, आंदोलनस्थळी तहसीलदार अभिजीत बारवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बैसाणे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता दराडे, विभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे आदी अधिकारी उपस्थित झाले. त्यांनी एल्गार कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष मधे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. दोन दिवसांत जिल्हाधिकारी व आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांसमवेत संयुक्त बैठक घेऊन खैरेवाडीचा रस्ता प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ठोस ग्वाही तहसीलदारांनी दिल्यानंतर अडीच तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आणि वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. या आंदोलनात तानाजी कुंदे, सुरेखा मधे, गणपत गावंडा, काळू निरगुडे, मंगल खडके आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ^खैरेवाडीची रस्ता वनविभागातून जात होता, त्यामुळे जागेचा प्रश्न वनविभागाकडे अडकला होता. त्यामुळे याबाबत सतत पाठपुरावा केला. यामुळे जागेचा प्रश्न सुटला आहे. आता रस्ता कामाला सुरवात झाली आहे. – हिरामण खोसकर, आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *