पालांदुरचे नागरिक तहानलेलेच:हर घर जल योजना फलकापूरतीच मर्यादीत, यंदा तरी मिळणार का जल जीवनचे पाणी?




लाखनी तालुक्यातील १०४ गावांपैकी ८२ गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे उरकण्यात आली आहेत.अशा ८२ गावांप्रमाणेच पालांदूर या गावातही जलजीवन मिशनचे वास्तव आजही कागदावरच असल्याचे चित्र आहे.’हर घर जल’ या घोषणेखाली योजना मंजूर झाली,भूमिपूजन झाले, फलकही उभे राहिले; मात्र आजही अनेक घरांपर्यंत नळाचे पाणी पोहोचलेले नसल्याची वस्तुस्थिती दिसून येत आहे. पालांदूर गावातील अनेक नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.काही ठिकाणी पाईपलाइन टाकून काम थांबले आहे,तर काही ठिकाणी नळजोडणीच झाली नाही.त्यामुळे येत्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याची माहिती आहे. पाणीटंचाईमुळे अनेक महिलांना रोज डोक्यावर हंडे घेऊन दूरवर जावे लागत आहे.काही कुटुंबे विहिरींवर किंवा दूरच्या नळांवर अवलंबून आहेत.महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणे,ही गंभीर बाब आहे.निधी वेळेवर न मिळणे,ठेकेदारांची दिरंगाई, निकृष्ट दर्जाची कामे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे योजना रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.उ‌द्घाटनांचे फोटो प्रसिद्ध होतात;मात्र नळातून पाणी येत नाही,अशी नाराजी नागरिकांमध्ये आहे. पालांदूर गावातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा कामांचा तातडीने आढावा घ्यावा,निधी उपलब्ध करून द्यावा,दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी आणि प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वर्षभर महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागतो पालांदूर गावातील अनेक वार्डांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट अवस्थेत आहेत.कुठे पाइपलाइन टाकून ठेवण्यात आली आहे,तर कुठे नळजोडणीच अपूर्ण आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर’ यंदाच्या उन्हाळ्यात तरी नळातून पाणी मिळणार का?’असा सवाल ग्रामस्थांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. गावातील पाणीटंचाई ही केवळ उन्हाळ्यापुरती मर्यादित नसून, अनेक वॉर्डांतील महिलांना वर्षभर डोक्यावर हंडे घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे भीषण वास्तव आहे. पाणी टंचाईपूर्वी दखल घेण्याची मागणी… उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जानेवारी महिन्याच्या शेवटीच पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले आहे.कित्येक नळांना तोट्याच नाहीत.त्याद्वारे पाणी वाया जात आहे.ते रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. आज अखेर झालेल्या ग्रामसभा, मासिक सभेच्या बैठकांतून वेळोवेळी वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थांसह विद्यमान सदस्यांनी अचूकपणे मांडला.मात्र तेवढ्यापुरतेच लक्ष दिले जाते. ठोस उपाययोजना केली जात नाही. सरपंचांनी याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *