![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि रस्त्यावरील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत ६ अनधिकृत होर्डिंग्ज पाडण्यात आली, तर १२ लाख ८७ हजार रुपयांचा थकीत जाहिरात कर वसूल करण्यात आला. तसेच, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या २५ हातगाड्या आणि टपऱ्या जप्त करण्यात आल्या. मालमत्ता विभागाने अतिक्रमण विभागाला २२ अनधिकृत आणि थकीत कर असलेल्या होर्डिंग्जची यादी दिली होती. यापैकी ६ होर्डिंग्जवर मनपाने कारवाई केली. विशेष म्हणजे, कारवाईच्या भीतीने ८ होर्डिंग मालकांनी स्वतःच आपले होर्डिंग काढून घेतले, तर ६ होर्डिंग धारकांनी थकीत असलेले १२ लाख ८७ हजार रुपये तात्काळ भरले. पडेगाव येथील एका होर्डिंगवर रविवारी कारवाई केली जाणार आहे. गेल्या १२ वर्षांपासून सहा होर्डिंगचे नूतनीकरण झालेले नव्हते. यात हिंदुस्तान पेट्रोलियमचे दोन, मनु ॲडचे दोन, सागर ॲड आणि नागपाल ग्रुपचे प्रत्येकी एक होर्डिंग होते. क्रांतीचौक, सेव्हन हिल, सातारा, सिल्लेखाना आणि हर्सूल येथील दोन होर्डिंग पाडण्यात आले. यासोबतच, एमजीएम परिसर आणि क्रांती चौक परिसरातील रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या २५ हातगाड्या व टपऱ्या जप्त करण्यात आल्या. रस्त्यावर लावलेले बोर्ड आणि इतर सामानही जेसीबीने हटवण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या आदेशाने करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, प्राप्ती जाधव, अशोक कदम यांच्यासह नागरी मित्र पथकाचे जवान आणि अतिक्रमण हटाव विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कारवाईसाठी २ पोकलेन, २ जेसीबी आणि ४ हायवा वाहने तैनात करण्यात आली होती. या धडक कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे झाले असून, वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. मनपाच्या या मोहिमेमुळे शहरात शिस्तबद्धता आणण्यास मदत होणार आहे.
मनपाची अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई:12.87 लाख कर वसूल; वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न
