फेटरीतील ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा खून:आरोपीने यापूर्वी दोनदा केला होता मारण्याचा प्रयत्न; रुचिता करत होती पोलीस भरतीची तयारी




कळमेश्वर-नागपूर महामार्गावरील फेटरी गावातील ओयो हॉटेलमध्ये २२ जानेवारीच्या मध्यरात्री एका तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. रुचिता राजेश भांगे (वय २१, रा. बोरगाव, वेलकम सोसायटी, शिवमंदिर जुनी वस्ती, गिट्टीखदान, नागपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सौरभ उर्फ बिट्टू जामगडे (वय २५, रा. आष्टी, जिल्हा) याला आरोपी करण्यात आले आहे. रुचिता नागपूर येथील धनवटे महाविद्यालयात बीए अंतिम वर्षात शिकत होती आणि पोलीस भरतीची तयारी करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभ जामगडे याने दोन वर्षांपूर्वीही रुचिताला तिच्या घरी जाऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शेजाऱ्यांनी धाव घेऊन सौरभला पळवून लावले होते. त्यानंतर काही काळ हे प्रकरण शांत झाले होते. अलीकडे चार दिवसांपूर्वी, रुचिता आणि तिची मैत्रीण पोलीस मुख्यालय क्रीडांगणावर पोलीस भरतीचा सराव करत असताना आरोपी सौरभ तिथे पोहोचला. त्याने रुचिताला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आणि तिचा मोबाईलही पळवून नेला होता. २२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता रुचिता घरातून निघून गेली होती. ती घरी परत न आल्याने तिच्या लहान भावाने वडिलांना माहिती दिली. वडिलांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता, रुचिता त्या दिवशी पोलीस भरती सराव आणि क्लासलाही आली नसल्याचे समजले. त्यामुळे रुचिताच्या वडिलांनी २२ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता गिट्टीखदान पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. २३ जानेवारी रोजी फेटरी येथील ओयो हॉटेलमधील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १०५ मधील बेडवर रुचिता रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळली. रुचिताचा चुलत भाऊ रजत शिंगणे याने आरोपी सौरभ उर्फ बिट्टू जामगडे यानेच तिचा खून केल्याची तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून, ठाणेदार मनोज काळबांडे यांनी पोलीस पथके तयार केली आहेत आणि आरोपीचा कसून शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि मृत तरुणी दोघेही ओयो हॉटेलमध्ये चेक इन करून एका खोलीत गेले होते. काही वेळानंतर त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील रिसेप्शनिस्टने हस्तक्षेप करून दोघांना समजावले. त्यावेळी युवकाने पुढे कोणताही वाद होणार नाही, असे आश्वासन दिल्याने परिस्थिती तात्पुरती शांत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *