![]()
शिवसेना संस्थापक पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने श्री षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर आले आहेत. विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर उभय नेते पहिल्यांदाच एकत्र आले. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोवाडाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली परिस्थिती तसेच शिवसेना पक्षात घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत शिंदे गट तसेच भाजपवर टीका करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यावेळी म्हणाले, माझ्या जमलेल्या सर्व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रेमींचे मी स्वागत करतो. मला फार सर्दी झाली आहे, त्यामुळे शब्दांवरचे अनुस्वार गेले आहेत. मागे उद्धव आजारी होते तेव्हा माझ्या फॅमिली डॉक्टरांकडून मी औषधं दिली. आता मी त्यांच्याकडून औषध घेत आहे, सहा दिवस झाले अजून बरा नाही. मग मी उद्धवला फोन करून विचारले, माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय, असे म्हणताच एकच हशा पिकला. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आज सामनामध्ये मी लेख लिहिला आहे, त्यात अनेक आठवणी मी लिहिल्या आहेत. खरे तर त्या व्यक्तीला कसे मांडायचे हे अनेकदा प्रश्न माझ्यासमोर उभे राहतात, काका म्हणून मांडायचे, व्यंगचित्रकार म्हणून मांडायचे की काय.. त्यांचे अनेक किस्से हे न सांगण्यासारखे आहेत. तुम्हाला माहीत नाही काय होते ते, तुम्हाला फक्त भाषणातून झलक दिसली आहे. बाळासाहेब व्यंगचित्र काढताना समाधी असायची राज ठाकरे म्हणाले, मी लहान असतानापासून त्यांना पाहत आलो आहे. बाहेर सगळं भयानक वातावरण सुरू असताना, हे जेव्हा व्यंगचित्र काढायला बसायचे, तेव्हा त्यात मला कधीच मारकाम नाही दिसले. ती समाधी लागणे म्हणतात. ते व्यंगचित्र नसून समाधी असायची. तेंडुलकरांचे एक फार छान पुस्तक आहे, ‘हे सगळे येते कुठून’, असे ते व्यक्तिमत्व आहे. देशातील सगळ्या राजकारण्यांपासून ते वेगळे होते, त्याचे कारणच ते असायचे. बाळासाहेब आज नाहीत तेच बरे पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज महाराष्ट्राची जी परिस्थिती झाली आहे म्हणजे गुलामांचा बाजार. आजची परिस्थिती बघून मला असे वाटत आहे की बाळासाहेब आज नाहीत तेच बरे आहे. काय त्रास झाला असता त्या माणसाला. कुठे नेतोय आपण? आज ही परिस्थिती बघायला बाळासाहेब नाहीत यापेक्षा चांगली गोष्ट नाही. ज्या गोष्टी शून्यातून उभ्या केल्या. बाहेरच्या पक्षात बघा, अनेक लोक दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केली होती. सकाळी गेल्यावर साफ झालेली बरी.. मी जेव्हा बाहेर पडलो, त्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणे नव्हते, माझ्यासाठी घर सोडणे होते. या सगळ्याला 20 वर्षांचा काळ उलटून गेला आहे. अनेक गोष्टी आम्हाला उमगल्या आहेत. द्या सोडून ते आता. काय सकाळी गेल्यावर साफ झालेली बरी असते, कुठे आयुष्यभर कुंथत बसायचे? असा प्रश्न विचारात खट्याळ जोक यावेळ राज ठाकरेंनी मारला. राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मला व्याख्यान द्यायला आवडेल. त्यांच्या सगळ्या पैलू मला उलगडायला आवडेल. बाळासाहेब ठाकरे कसा होता हे जगाला कळलेच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला कळले नाहीत, तुम्हाला कुठून कळणार? असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी केले ट्विट वाचून दाखवले. बाळासाहेबांनी या देशात हिंदूंना हिंदू शक्ती बनू शकते हे दाखवून दिले पुढे राज ठाकरे यांनी एक प्रसंग सांगितला, बाळासाहेब कलानगरमध्ये फेऱ्या मारायचे, ही गोष्ट आहे 94-95 ची असेल. तेव्हा बाळासाहेब प्रमोद महाजन यांना असे म्हणाले होते की, प्रमोद मी देशातील हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावेल आणि हिंदू मतदार तयार होतील. प्रमोद महाजन म्हणाले, हे शक्य नाही या देशात. यावर बाळासाहेब म्हणाले तू मला ओळखत नाहीस आणि बाळासाहेबांनी या देशात हिंदूंना हिंदू शक्ती बनू शकते हे दाखवून दिले. भाजपला तर कल्पना पण नव्हती. त्यावेळेला वातावरण सुद्धा वेगळे होते. आज बाळासाहेब असते आणि हिंदुत्वाचा बाजार पाहिला असता, तर निश्चित व्यथित झाले असते. मी काय सांगितले होते आणि तुम्ही काय करून ठेवले? असा प्रश्न त्यांनी विचारला असता. त्यांनी ज्या तडफेने जे विचार मानले, हिंदूंना हिंदू म्हणून जागे केले, मराठीला मराठी म्हणून जागे केले. हे आपण असेच जागे ठेऊ, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाकरे बंधू एकाच मंचावर:महाराष्ट्राची आजची परिस्थिती बघायला बाळासाहेब नाहीत यापेक्षा चांगले काहीच नाही – राज ठाकरे
