राजपथ इन्फ्राकॉनने रस्ते निर्मितीत चार गिनीज विक्रम केले:पुण्यातील संस्थेने बंगळूर-विजयवाडा कॉरिडॉरवर ऐतिहासिक कामगिरी केली




पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन या रस्ते बांधणी संस्थेने आंध्र प्रदेशातील बंगळूर-विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉरवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संस्थेने एकाच महामार्गावर, एकाच मोहिमेत सलग चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रस्थापित केले आहेत. असे करणारी ही जगातील पहिलीच संस्था ठरली आहे. हे विक्रम ५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत एनएच-५५४जी या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाच्या पॅकेज २ आणि ३ वर नोंदवण्यात आले. राजपथ इन्फ्राकॉनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी गुरुवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेत २४ तासांत सलग टाकण्यात आलेला बिटुमिनस काँक्रीटचा सर्वात लांब पट्टा (९.६३२ किमी, ३ पदरी) आणि २४ तासांत टाकण्यात आलेले सर्वाधिक बिटुमिनस काँक्रीट (१०,६५७ मेट्रिक टन) हे दोन विक्रम समाविष्ट आहेत. तसेच, सलग टाकण्यात आलेला सर्वात लांब बिटुमिनस काँक्रीटचा पट्टा (५२.४१ किमी, ३ पदरी म्हणजेच १५७ किमी एक पदरी) आणि सलग टाकण्यात आलेले सर्वाधिक बिटुमिनस काँक्रीट (५७,९८२ मेट्रिक टन) असे आणखी दोन विक्रम नोंदवले गेले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मूल्यांकन पथकाने याची अधिकृत पडताळणी करून प्रमाणपत्र दिले आहे. या विक्रमी कामगिरीसाठी सेन्सर पेव्हर, पाच हॉट-मिक्स प्लांट्स, ७० हायवा टिपर्स, विविध प्रकारचे रोलर्स आणि ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे २४ तास अचूक समन्वय साधण्यात आले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) मार्गदर्शनाखाली कठोर गुणवत्ता व सुरक्षितता मानकांचे पालन करण्यात आले. आयआयटी मुंबई आणि सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे तांत्रिक सहकार्यही या प्रकल्पाला लाभले. भारतमाला प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेला हा कॉरिडॉर दक्षिण व पूर्व भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. ही कामगिरी ‘विकसित भारत’च्या संकल्पनेशी सुसंगत असून, देशाच्या आधुनिक महामार्ग अभियांत्रिकी क्षमतेचे जागतिक स्तरावर प्रभावी दर्शन घडवणारी असल्याचे कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *