![]()
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि चाहत्यांची आवडती जोडी असलेल्या आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी अखेर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत करत दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होत असल्याची माहिती दिली. मात्र, मुलगी जिजाच्या संगोपनासाठी दोघेही एकत्र जबाबदारी पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ आणि त्यांची सून ऊर्मिला यांच्यात गेल्या काही काळापासून दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या चर्चांवर शिक्कामोर्तब करत या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सुखी संसाराचा अधिकृत ‘दी एन्ड’ झाल्याचे जाहीर केले आहे. काय म्हटले आहे सोशल मीडिया पोस्टमध्ये? आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, खूप विचारमंथनानंतर त्यांनी परस्पर संमतीने आणि अत्यंत सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. “पती-पत्नी म्हणून आमचा प्रवास इथेच थांबत असला, तरी आमची लाडकी लेक जिजा हीच आमचे सर्वस्व आहे. तिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र उभे राहू. तिला आई-वडिलांचे भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि खंबीर पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही अत्यंत आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने तिचे ‘को-पॅरेंटिंग’ (Co-parenting) करणार आहोत,” असे त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. खाजगीपणाचा आदर करण्याची चाहत्यांना आणि मीडियाला विनंती एकमेकांसोबत घालवलेल्या १५ वर्षांच्या दीर्घ सहवासाबद्दल दोघांच्याही मनात कायम आदर राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आजवर चाहत्यांनी आणि माध्यमाने दिलेल्या खंबीर साथीबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. आयुष्याच्या या अत्यंत खाजगी आणि नव्या टप्प्यावर सर्वांनी आमच्या प्रायव्हसीचा आदर राखावा. या विषयावर हे आमचे पहिले आणि शेवटचे वक्तव्य असून, यापुढे आम्ही यावर कोणतीही चर्चा करणार नाही, अशी विनंतीही या जोडप्याने केली आहे. मैत्री ते घटस्फोट: १५ वर्षांचा प्रवास आदिनाथ आणि ऊर्मिला यांच्या लव्हस्टोरीची मराठी सिनेसृष्टीत नेहमीच चर्चा असायची. सुरुवातीला त्यांच्यात घट्ट मैत्री होती, ज्याचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली आणि ऊर्मिला कोठारे कुटुंबाची सून झाली. त्यांच्या सुखी संसारात २०१७ मध्ये ‘जिजा’ या गोंडस मुलीचे आगमन झाले. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे वाटत असतानाच, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ते एकत्र दिसत नव्हते. अखेर, आज या दोघांनीही अधिकृत घोषणा करत आपल्या १५ वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम दिला आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांची सोशल मिडिया पोस्ट.. हेही वाचा.. दीपिकाने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली का?:सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल; दावा- अभिनेत्रीने काही मिनिटांत डिलीट केली सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोणबद्दल सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. इंटरनेटवर दीपिकाच्या कथित इंस्टाग्राम स्टोरीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. यामध्ये दावा केला जात आहे की, दीपिकाने सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आणि देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, तिने ही पोस्ट काही मिनिटांतच डिलीट केली. सविस्तर वाचा
