![]()
मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीनंतर माहीम विधानसभा परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वॉर्ड क्रमांक 194 मधून शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लढलेले समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवामागे थेट भाजपच्या असहकाराची कारणमीमांसा केली आहे. निवडणूक लढत केवळ विरोधकांशी नव्हती, तर आपल्या प्रभागातच एक मोठं राजकीय जाळं आपल्या विरोधात उभं राहिलं होतं, असा गंभीर आरोप त्यांनी केला. चार ते पाच आमदार, दोन मोठ्या पक्षप्रमुखांची मुलं प्रचारात उतरली होती आणि या सगळ्यांचा रोख माझ्याच विरोधात होता, असं सरवणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. तरीही मतदारांनी शेवटपर्यंत साथ दिली, मात्र युतीतील भाजपने मदत न केल्यामुळे पराभव ओढवला, असा त्यांचा दावा आहे. समाधान सरवणकर यांच्या म्हणण्यानुसार, माहीममध्ये निवडणूक केवळ पक्षीय नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरही लढली गेली. माझ्या विरोधात मोठी ताकद एकवटली होती. तरीदेखील स्थानिक मतदार माझ्या बाजूने उभे राहिले होते. मात्र निवडणूक काळात भाजपकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. भाजपच्या एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सर्व कार्यकर्त्यांना माझ्या प्रचारापासून दूर राहण्याचे आदेश दिले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे ‘यांना मदत करू नका’ असे स्पष्ट निर्देश दिले जात होते, त्यामुळे माहीममध्ये भाजपचे कार्यकर्ते पूर्णपणे अलिप्त राहिले, असं सरवणकर यांनी सांगितलं. या आरोपांनंतर परिस्थिती अधिकच चिघळली असून काही व्हॉट्सअॅप चॅट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चॅट्समध्ये सरवणकर कुटुंबाचं काम करू नका, असे थेट संदेश पाठवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. समाधान सरवणकर यांच्या मते, हे संदेश निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फिरत होते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या प्रचारावर झाला. युती असतानाही जाणीवपूर्वक असहकार दाखवण्यात आल्याने आपला पराभव झाला, असं ते ठामपणे सांगत आहेत. या प्रकरणामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. व्हायरल झालेल्या मेसेजमधील मजकूर अधिक खळबळजनक ठरत आहे. या संदेशांमध्ये माजी आमदार किंवा त्यांची मुलगी फोन करत असतील, तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मदत करू नये, असे स्पष्ट निर्देश असल्याचा दावा केला जात आहे. युती असली तरी प्रिया सरवणकर यांना मदत करू नका, असेही या मेसेजमध्ये नमूद असल्याचं सांगितलं जात आहे. सदा सरवणकर यांनी यापूर्वी वरिष्ठांचा अपमान केल्याचा आरोप करत, त्यांच्या कुटुंबाला मदत न करण्याचं आवाहन करण्यात आलं, असा दावा या चॅट्समधून समोर येतो आहे. या मेसेजमुळे युतीतील अंतर्गत संघर्ष अधिकच स्पष्ट झाला आहे. भाजप पदाधिकारी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणार दरम्यान, या आरोपांनंतर भाजपकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. माहीममधील भाजप पदाधिकारी आता सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे. दुपारी 12 वाजता वांद्रे येथील सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली जाणार असून, सरवणकर यांनी भाजपविरोधात खोटे आणि दिशाभूल करणारे मेसेज तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन कायदेशीर वळण घेत असल्याचं दिसत आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला मोठा फटका या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 194 आणि 191 मधील निकाल महत्त्वाचे ठरले आहेत. वॉर्ड 194 मध्ये शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांचा सामना ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे यांच्याशी झाला. या लढतीत निशिकांत शिंदे यांनी विजय मिळवला. तर वॉर्ड क्रमांक 191 मध्ये शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर यांचा सामना ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांच्याशी झाला आणि त्या ठिकाणीही ठाकरे गटाने बाजी मारली. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. युतीतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असली, तरी 90 जागा लढवून केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. या पराभवानंतर शिंदे गटातील अनेक पराभूत उमेदवारांनी उघडपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. माहीममधील सरवणकर प्रकरणामुळे शिवसेना–भाजप युतीतील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात या वादाचे पडसाद मुंबईच्या राजकारणात अधिक तीव्रपणे उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्हॉट्सॲप मेसेजमुळे पराभव? सरवणकर-भाजप संघर्ष पेटला:ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला धक्का, आरोपांची राळ उडाली
