सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

0
240_177747920469f22e244402f_silloduposhanhd.jpg




प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करून फेरफार घेतल्याचा आरोप आहे. हे बक्षीसपत्र व फेरफार रद्द करावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (२८ एप्रिल) दुपारी ११ वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शिंदेफळ येथील कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला दोन दिवस झाले तरी प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. उपोषणाला रमेश रामलाल पठ्ठे, लक्ष्मी रमेश पठ्ठे, सविता सुभाष पठ्ठे, ११ वर्षीय वेदिका सुभाष पठ्ठे, ४ वर्षीय हर्षश्री सुभाष पठ्ठे बसले आहेत. दोन लहान मुलींसह आई-वडील तहसीलसमोर ठिय्या देऊन आहेत. शिंदेफळ येथील गट क्रमांक ३९ मधील ७० गुंठे जमीन मनुबाई रामलाल पठ्ठे यांच्या नावे आहे. मनुबाई यांचे वय ८२ वर्षे आहे. या जमिनीला एकूण ६ वारसदार आहेत. तरी मनुबाई यांच्याकडून त्यांचा लहान मुलगा पंडित रामलाल पठ्ठे, मुलगी कमला मोहन शिखरे यांनी रजिस्टर बक्षीसपत्र करून घेतल्याचा आरोप आहे. त्याआधारे आमठाणा येथील मंडळ अधिकारी विष्णू सोनुने, ग्राम महसूल अधिकारी गिरीश झाल्टे यांनी ८ मार्च २०२६ रोजी फेरफार घेतला, असे उपोषणकर्त्या लक्ष्मी रमेश पठ्ठे यांनी सांगितले. मनुबाई यांना तीन मुलगे, तीन मुली आहेत. बक्षीसपत्र करताना इतर मुलगे, मुलींची संमती घेतली नाही, असा दावा आहे. वारसदारांनी आक्षेप घेतला तरी मंडळ अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून फेरफार घेतल्याचा आरोप कुटुंबाने केला. बेकायदा बक्षीसपत्र, फेरफार रद्द करून दोषींवर कारवाईची मागणी कुटुंबाने लावून धरली आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed