झणझणीत मटण-रोडग्याच्या बेताने रंगली जत्रा:श्रद्धा, परंपरा, संस्कृती यांचा संगम, खवय्यांची चंगळ असलेली यात्रा पंतक्रोशीत प्रसिद्ध‎




जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर भरणारी बहिरमची यात्रा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. ५ डिसेंबर ते ५ फेब्रुवारी अशी दोन महिने ही यात्रा चालते. विशेष म्हणजे, आता दीड महिना उलटला असतानाही बहिरम यात्रेतील गर्दी, उत्साह आणि आनंद शिगेला पोहोचला आहे. श्रद्धा, परंपरा, संस्कृती यांचा संगम आणि खवय्यांची चंगळ असलेली ही यात्रा विदर्भाच्या लोकजीवनाशी घट्ट नाळ जोडून आहे. भैरव बाबा हे बहिरम बाबा म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. फार पूर्वीपासून मेळघाटातील आदिवासी बांधव घनदाट जंगलात असणाऱ्या बहिरम बाबाच्या दर्शनासाठी येतात. काळाच्या ओघात या यात्रेला सामाजिक स्वरूप लाभले. सुमारे दीड दोनशे वर्षांपूर्वी ही यात्रा शेतकऱ्यांची यात्रा म्हणून ओळखली जाऊ लागली. शेतीची कामे आटोपल्यानंतर शेतमाल विकून हाती आलेल्या पैशातून शेतकरी बांधव बहिरम यात्रेत सहभागी होत असते. शेतीसाठी लागणारी अवजारे, व्यवहार आणि अनेकांची लग्न जुळण्याचे केंद्र म्हणून या यात्रेला महत्त्व होते. आजही बहिरमची यात्रा केवळ अमरावती जिल्हापुरती मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भासाठी जिव्हाळ्याची आहे. मागील काही वर्षात मराठवाडा आणि खानदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक इथं येऊ लागलेत. लहानापासून थोरांपर्यंत साऱ्यांचीच मेजवानी बहिरमची यात्रा म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर कुटुंबीयांसोबतचा आनंदोत्सव आहे. लहान मुलांपासून तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वांसाठी यात्रेत काहीना काही खास आहे. अनेक कुटुंब एकत्र येऊन कोणी रोडगे, तर कोणी बटाटे वांग्याची भाजी तर काहीजण हंडीतल्या मटणाची चव चाखतात. मातीच्या हंडीत शिजवलेले मटण बहिरम यात्रेचे एक आकर्षण म्हणजे मातीच्या हंडीत शिजवलेलं मटण. हंडीतून मटण शिजवून देणारी ६० ते ७० हॉटेल यात्रेच्या परिसरात आहेत. अनेक खवय्ये स्वतः मटण आणून हॉटेल वाल्यांना देतात आणि ते हंडीत शिजवून घेतात. काहीजण लगतच्या जंगल परिसरात स्वतः हंडीमध्ये पारंपारिक पद्धतीनं मटण शिजवण्याचा आणि मटण चाखण्याचा आनंद घेतात. मटणासोबतच रोडगे पार्टी करण्यासाठी देखील अनेक जण बहिरमच्या यात्रेत येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *