प्रशांत वैद्य यांना 'गझल साधना जीवन गौरव' पुरस्कार जाहीर:अमरावती येथील तिसऱ्या 'एल्गार' मराठी गझल संमेलनात होणार गौरव




साधना संस्था, अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गझल साधना जीवन गौरव पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध गझलकार प्रशांत वैद्य यांना जाहीर झाला आहे. रोख 11 हजार रुपये, शाल, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 7 व 8 फेब्रुवारी रोजी अमरावती येथे संपन्न होणाऱ्या तिसऱ्या ‘अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनात’ ज्येष्ठ गझलकार व अभ्यासक डॉ. राम पंडित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभदा लोहिया व सचिव दगडू लोमटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रशांत वैद्य यांनी गेल्या 40 वर्षांपासून मराठी गझल, कविता आणि गीतलेखन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या रचना उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, डॉ. नेहा राजपाल यांसारख्या दिग्गज गायकांनी गायल्या आहेत. ‘अहवाल’, ‘विजांचा सोयरा’ आणि ‘गुलमोहर फुलताना’ हे त्यांचे गझलसंग्रह प्रसिद्ध असून ‘कविता आणि गझल’ हा त्यांचा नवीन संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लेखनासोबतच त्यांनी मराठी गझलेच्या प्रचारासाठी 1988 पासून मुशायरे आणि साप्ताहिकातून लिखाण सुरू केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘गझलकट्टा’ पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले असून, मराठी गझलेच्या अस्तित्वाच्या लढाईत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. साधना संस्थेने 2025 पासून मराठी गझल क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी हा जीवन गौरव पुरस्कार सुरू केला आहे. गेल्या वर्षी पहिला पुरस्कार गझलगंधर्व सुधाकर कदम यांना प्रदान करण्यात आला होता. यंदाच्या पुरस्कारासाठी प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, नाना लोडम आणि दगडू लोमटे यांच्या निवड समितीने प्रशांत वैद्य यांच्या नावाची शिफारस केली होती. या निवडीबद्दल साहित्य आणि गझल क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. संस्थेच्या विशेष बैठकीत अमर हबीब, अविनाश मुडेगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *