![]()
पुण्यातील विमाननगर परिसरातील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका दूधवाल्याला बेड्या ठोकल्या आहेत. या दूधवाल्यावर घराच्या डिजीटल लॉकचा पासवर्ड मिळवून चोरी केल्याचा आरोप आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, रामेश्वरम कॅफेचे मालक पु्यातील विमानननगर भागात राहतात. त्यांच्या घरी नुकतीच चोरी झाली. पोलिसांनी या चोरीप्रकरणी व्यंकटेश करंडे नामक एका दूधवाल्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. आरोपी सकाळी दूध टाकण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या घराजवळ यायचा. घराच्या दरवाजाला असलेल्या डिजीटल लॉकचा गैरफायदा घेत तो वेगवेगळे पासवर्ड टाकून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. या डिजिटल लॉकमध्ये एका वेळेला फक्त 3 वेळा पासवर्ड टाकण्याची मुभा असते. चौथ्या प्रयत्नानंतर पासवर्ड चुकला असता की-पॅड काही काळासाठी लॉक होते. आरोपीने मागील 3 महिन्यांपासून अनेकदा अशा प्रकारे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येकवेळी त्याला अपयश येत होते. अखेर 17 जानेवारी रोजी आरोपीने टाकलेला पासवर्ड खरा ठरला व घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्याने घरात प्रवेश करून कपाट ठेवलेली 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर तेथून लंपास झाला. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही सर्व घटना कैद झाली. पोलिसांनी याच फुटेजच्या आधारावर तपासाची चक्रे फिरवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त केली. ससून रुग्णालयातून आरोपीचे पलायन दुसरीकडे, पुण्यातील ससून रुग्णालयातून एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची घटना घडली आहे. सनी गौतम कुचेकर असे आरोपीचे नाव आहे. त्याला फिटसारखे झटके येत असल्यामुळे रविवारी ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दाखल करण्यात आले होते. उपाचारानंतर प्रकृती सुधारताच त्याने सोमवारी पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. रुग्णालयाच्या माहितीनुसार, आरोपीने स्वच्छतागृहाच्या काचा काढून इमारतीच्या रंगकामासाठी उभारलेल्या बारच्या मदतीने पळ काढळा. त्यानंतर त्याने स्वतःच्या हाथकड्या तोडून तेथून पळ काढला. तो पळून जाण्याचा घटनाक्रम रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. पोलिस त्या आधारावर तपास करत आहेत.
पुण्यात रामेश्वरम कॅफे मालकाच्या घरात चोरी:घराच्या हायटेक डिजीटल लॉकचा पासवर्ड मिळवून दूधवाल्यानेच मारला डल्ला
