![]()
‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला आज उत्साहात सुरुवात झाली. हिंजवडी येथील टी.सी.एस. सर्कल येथून या टप्प्याची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून औपचारिक सुरुवात करण्यात आली. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. पहिल्या टप्प्याचे एकूण अंतर ९१.८ किलोमीटर होते. हा टप्पा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातील घाट-वळण रस्त्यांवरून जात असल्याने सायकलपटूंना वेग, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याची कसोटी लागली. निसर्गरम्य परिसरातून मार्गक्रमण करत हा टप्पा डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी सुमारे ४ वाजता संपला. या टप्प्यात माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने या टप्प्यासाठी व्यापक तयारी केली होती. स्पर्धा मार्गाची पाहणी करून वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. काही कालावधीसाठी मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली होती आणि आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बंद ठेवण्यात आले होते. पोलीस प्रशासनासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण मार्गावर तैनात होते. स्पर्धेदरम्यान, घाट-वळणाच्या रस्त्यांवर सायकलपटूंनी वेग आणि क्षमतेचा उत्तम मिलाफ दाखवला. काही ठिकाणी तीव्र वळणे, चढ-उतार आणि अरुंद रस्ते असल्याने स्पर्धकांसमोर आव्हाने होती. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलपटूंनी आत्मविश्वासाने हे आव्हान पेलले. मार्गावरील ठरावीक ठिकाणी वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, तांत्रिक मदत वाहने आणि रिफ्रेशमेंट पॉइंट्स सज्ज ठेवण्यात आले होते. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोटरसायकल पथकांच्या माध्यमातून स्पर्धा परिसराचे सातत्याने निरीक्षण करण्यात येत होते. स्पर्धेच्या समारोपस्थळी सायकलपटूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विजयी आणि आघाडीवरील सायकलपटूंनी माध्यमांशी संवाद साधताना मार्गाची रचना, निसर्गसौंदर्य आणि भारतीय प्रेक्षकांचा उत्साह अविस्मरणीय असल्याची भावना व्यक्त केली. अनेक परदेशी खेळाडूंनी पुणे जिल्ह्यातील घाटरस्ते जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत नोंदवले. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर पोहोचावीत, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी आणि तरुणांना क्रीडा व पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्याने आगामी टप्प्यांबाबत सायकलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुणे जिल्ह्याच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक प्रतिमेला नवे परिमाण देणारी ठरेल, अशी अपेक्षा आहे.
बजाज पुणे ग्रँड टूरचा पहिला टप्पा सुरू:हिंजवडी ते आकुर्डी मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी
