प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी एकमेव निवासी क्रीडा स्पर्धा:मएसो क्रीडा करंडक स्पर्धेचे 23 ते 25 जानेवारीला आयोजन




महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो) क्रीडावर्धिनी आणि बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आंतरशालेय ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २३, २४ व २५ जानेवारी रोजी मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती मएसो संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पाटील यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे १४ वे वर्ष असून, ६ ते १० वयोगटातील खेळाडूंसाठी महाराष्ट्रातील ही एकमेव निवासी स्पर्धा आहे. लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्यासाठी ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा दरवर्षी जानेवारी महिन्यात तीन दिवस आयोजित केली जाते. यात सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या सांघिक मैदानी खेळांचा समावेश आहे. खेळांमुळे विद्यार्थ्यांचे शरीर तंदुरुस्त राहते, ताकद, चपळता आणि एकाग्रता वाढते. तसेच, संघभावना, शिस्त, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती यांसारख्या गुणांचा विकास होतो, जे त्यांच्या पुढील आयुष्यात उपयुक्त ठरतील. शाळा समिती आणि मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी सांगितले की, संस्थेच्या सर्व प्राथमिक शाळांसह परिसरातील एकूण २० शाळांमधून सुमारे १२०० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. हा क्रीडा महोत्सव पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त स्वरूपात साजरा केला जाईल. यासाठी शिक्षकांसाठी ‘झिरो वेस्ट मॅनेजमेंट’वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. खेळाव्यतिरिक्त मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ओरिगामी कार्यशाळा, जोशी रेल्वे संग्रहालय भेट, मेट्रो सफर, वाचक आणि कला कट्टा, मूल्याधिष्ठित लघुचित्रपट तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेला शाळा समिती आणि मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सचिव अतुल कुलकर्णी, क्रीडावर्धिनीचे महामात्र व संस्थेचे सहसचिव सुधीर भोसले, शाळेच्या महामात्रा डॉ. नेहा देशपांडे, क्रीडावर्धिनीचे क्रीडासमन्वयक प्रा. शैलेश आपटे, बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा दुर्वे आणि उपमुख्याध्यापिका डॉ. वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या ‘वीर’ मॅस्कॉटचे अनावरणही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *