मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोसहून पाहिली 'बजाज पुणे ग्रँड टूर' स्पर्धा:देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा थरार अनुभवला; क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन




महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा मंगळवारी सुरू झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले. मुख्यमंत्री फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोस येथे गेले आहेत. तिथे ते राज्याच्या औद्योगिक विकासासाठी विविध उद्योग संस्थांशी सामंजस्य करार करण्यात व्यस्त होते. या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी सोबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लॅपटॉपवर स्पर्धेचा थरार अनुभवला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत असताना, मुख्यमंत्र्यांनी सायकलपटूंच्या कौशल्याचे कौतुक केले. पुण्यात सायकलपटूंना मिळणारा प्रतिसाद, उत्सवाचे स्वरूप आणि तरुणाईचा उत्साह पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. ही स्पर्धा राज्यातील क्रीडा क्षेत्राला प्रेरक ठरेल आणि ‘सायकलचे शहर’ ही पुण्याची जुनी ओळख नव्या रूपात पुढे येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री सचिवालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत थेट प्रक्षेपण पाहताना स्पर्धेचा आनंद घेतला. एकीकडे महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी विविध देशांतील उद्योगसमूहांसोबत सामंजस्य करार होत असताना, दुसरीकडे राज्यातील क्रीडा क्षेत्रातील या ऐतिहासिक घडामोडीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेले विशेष लक्ष क्रीडा क्षेत्राला निश्चितपणे प्रोत्साहन देणारे आहे. भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या ‘ग्रँड टूर’ स्वरूपाच्या या स्पर्धेला जागतिक व्यासपीठावरून मिळालेली ही दाद क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियम, अत्याधुनिक आयोजन आणि विविध देशांतील नामवंत सायकलपटूंचा सहभाग यामुळे ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ने पुण्याला जागतिक सायकलिंगच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *