पुणे मनपा निवडणुकीतील EVMवर गंभीर प्रश्नचिन्ह:निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा माजी नगरसेवक सतीश म्हस्केंचा आरोप




पुणे महानगरपालिका निवडणुकीतील ईव्हीएम (EVM) आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक सतीश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत या प्रक्रियेत धक्कादायक अनियमितता झाल्याचा आरोप केला. लोकशाही जनतेच्या विश्वासावर आधारित असते, मात्र या घटनांमुळे नागरिकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रभाग क्रमांक १ मधील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्या पराभूत उमेदवार मीनाक्षी सतीश म्हस्के यांच्यासह प्रसन्न पाटील, हेमलता विवेक बनसोडे, गिरीश जैवळ आणि विवेक बनसोडे उपस्थित होते. म्हस्के यांनी अनेक मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीन उपलब्ध नसणे किंवा त्यांचा वापर न करणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. मतदाराने दिलेले मत योग्य उमेदवारालाच नोंदवले गेले आहे की नाही, हे तपासण्याचा व्हीव्हीपॅट हा एकमेव मार्ग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, अनेक मतदारांनी ईव्हीएम मशीनवरील बटणे नीट काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या. काही ठिकाणी बटण दाबूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच, काही मतदान केंद्रांवर पोलीस प्रशासन व उमेदवारांना कोणतीही पूर्वसूचना न देता ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचे प्रकार समोर आले, जे निवडणूक नियमांचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला. सुमारे ५ ते ६ हजार मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून इतर प्रभागांत स्थलांतरित करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती किंवा कारणे देण्यात आली नाहीत. एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या बूथ व प्रभागांत नोंदलेली आढळणे, तसेच मतदान केंद्रावर गेल्यानंतर ‘तुमचे मतदान आधीच झाले आहे’ असे सांगितले जाणे, या बाबी अत्यंत गंभीर व संशयास्पद असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले. या सर्व प्रकारांबाबत निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयोगाने ७ ते ८ दिवसांत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व तांत्रिक व प्रशासकीय माहिती पुराव्यानिशी सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ही लढाई कोणत्याही एका पक्षासाठी नसून, प्रत्येक मतदाराच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *